Ratnagiri: जगबुडी नदीच्या पुलानजीक स्कूल बसचा अपघात, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:12 IST2025-07-30T17:11:29+5:302025-07-30T17:12:45+5:30
तर बस थेट नदीत कोसळून खूप मोठी दुर्घटना घडली असती

Ratnagiri: जगबुडी नदीच्या पुलानजीक स्कूल बसचा अपघात, सुदैवाने विद्यार्थी सुखरूप बचावली
खेड : तालुक्यातील रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या भोस्ते मार्गावर मंगळवारी (२९ जुलै) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कूल बसचा अपघात झाला. जगबुडी नदीवरील पुलाजवळ ही बस नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला कलंडली. गाडी अर्धवट थांबल्याने मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्वच्या सर्व २५ विद्यार्थी सुखरूप आहेत. बसमध्ये सुमारे २५ विद्यार्थी होते. या भीषण घटनेत सुदैवाने सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले असून, काहींना किरकोळ दुखापत झाली आहे.
भोस्तेकडून खेडकडे येणारी खासगी स्कूल बस अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्या अवस्थेतच बस रस्त्याच्या डाव्या बाजूला झुकली आणि कडेला जाऊन अर्धवट कलंडली. ही घटना जगबुडी नदीच्या पुलाजवळ घडली. जर बस काही अंतर पुढे गेली असती तर बस थेट नदीत कोसळून खूप मोठी दुर्घटना घडली असती. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी वेळीच धाव घेत विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले.
गेल्या काही महिन्यात खेड परिसरात स्कूल बसच्या अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हा चौथा अपघात असून, त्यामुळे पालक धास्तावले आहेत. बहुतेक शाळा खासगी चालकांच्या नादुरुस्त वाहनांवर विसंबून विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. काही ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी खचाखच भरले जात असून, आरटीओ, स्थानिक पोलिस आणि महामार्ग पोलिस यांच्याकडून याकडे अद्यापही गंभीरपणे पाहिले गेलेले नाही.