Russia-Ukraine crisis: रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:07 IST2022-02-25T17:55:25+5:302022-02-25T18:07:21+5:30
या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे

Russia-Ukraine crisis: रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले
रत्नागिरी : रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु असल्याने युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीयांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ८ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांशी पालकांनी संपर्क साधला असून, ते सर्व सुखरुप असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या नातेवाईंकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला आहे. या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रशासनाने परराष्ट्र मंत्रालयाला याची माहिती दिली आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथील तीन तर चिपळूण, मंडणगड, रत्नागिरी, लांजा व दापोली तालुक्यातील एक अशा एकूण आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यातील सहाजण एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला, एक विद्यार्थिनी दुसऱ्या वर्षाला तर एक विद्यार्थी तृतील वर्षाला शिक्षण घेत आहे.
या विद्यार्थ्यांमध्ये देवरुखातील अद्वैत विनोद कदम, साक्षी प्रकाश नरोटे, जान्हवी उमाकांत शिंदे, चिपळूण येथील वृक्षभनाथ राजेंद्र मोलाज, मंडणगडमधील आकाश अनंत कोबनाक, रत्नागिरीतील मिरकरवाडा येथील मुस्कान मन्सुर सोलकर, लांजातील सलोनी साजीद मनेर आणि दापाेलीची ऐश्वर्या मंगेश सावंत यांचा समावेश आहे.
युद्ध परिस्थितीमुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी सुरक्षित ठिकाणी असल्याची माहिती पालकांनी प्रशासनाला दिली आहे. परंतु, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशी आणावे, अशी विनंती पालकांनी प्रशासनाकडे केली आहे.
जिल्हा प्रशासन याबाबत परराष्ट्र विभागाशी संपर्कात आहे. परराष्ट्र खात्याकडून विद्यार्थी व नोकरीनिमित्ताने असणार्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थी लवकरच मायदेशी परततील असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.