Lek Ladki Yojana: रत्नागिरी जिल्ह्यात लाडक्या लेकींच्या खात्यात १ कोटी ४४ लाख रुपये जमा, कधी अन् किती रुपये मिळतो हप्ता.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:43 IST2025-11-15T15:43:10+5:302025-11-15T15:43:41+5:30
मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा योजनेचा उद्देश

Lek Ladki Yojana: रत्नागिरी जिल्ह्यात लाडक्या लेकींच्या खात्यात १ कोटी ४४ लाख रुपये जमा, कधी अन् किती रुपये मिळतो हप्ता.. वाचा
रत्नागिरी : जिल्ह्यात २ हजार ८९६ बालिकांना लेक लाडकी या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आली. त्यासाठी १ कोटी ४४ लाख ८० हजार रुपयांची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
‘लेक लाडकी’ योजना ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. ही योजना ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि जे पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारक, १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या बालिकांना या योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य दिले जाते.
योजनेचे उद्देश काय?
शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करणे, कुपोषण कमी करणे, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाला चालना देणे, मुलींचा मृत्युदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा योजनेचा उद्देश आहे.
असे दिले जातात हप्ते
पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, दुसरा हप्ता इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, तिसरा हप्ता सहावीमध्ये ७ हजार रुपये, चौथा हप्ता अकरावीत ८ हजार ३३ रुपये आणि लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एक लाख एक हजार एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांची तालुकानिहाय संख्या -
तालुका - लाभार्थी
- मंडणगड - २३
- दापोली - २९५
- खेड - २५०
- चिपळूण - ५०९
- गुहागर - २१६
- संगमेश्वर - २२९
- रत्नागिरी - ७७८
- लांजा - १६०
- राजापूर - २३३
- रत्नागिरी सिंधुदुर्ग अर्बन - २०२