Ratnagiri Crime: अपहार केलेल्या दागिन्यांवर काढले ३५ लाखांचे कर्ज, जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:23 IST2025-10-15T18:20:41+5:302025-10-15T18:23:34+5:30
कर्ला शाखेत अपहार, पोलिसांकडून सर्व दागिने हस्तगत

Ratnagiri Crime: अपहार केलेल्या दागिन्यांवर काढले ३५ लाखांचे कर्ज, जिल्हा बँकेच्या कर्ला शाखेत अपहार
रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ला शाखेतील अपहार करण्यात आलेल्या ५० लाखांच्या ५०४.३४ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. संशयित शिपाई अमोल आत्माराम मोहिते याने हे दागिने मुथ्थूट फायनान्स, चिपळूण अर्बन बँक आणि आयआयएफएल या फायनान्स कंपनीत तारण ठेवून त्यातून तब्बल ३५ लाखांचे कर्ज काढले होते.
हे सोन्याचे दागिने कॅशियर ओंकार कोळवणकर आणि शाखाधिकारी किरण बारये यांच्याशी संगनमत करून बँकेच्या तिजोरीत न ठेवता परस्पर लांबविले होते. हा अपहार त्यांनी १८ फेब्रुवारी २०२५ ते ४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत केला होता. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर २४ ऑगस्ट रोजी शहर पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहायक पोलिस निरीक्षक केदार वायचळ, काॅन्स्टेबल सतीश राजरत्न व इतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी संशयिताची कसून चौकशी केल्यानंतर त्याने अपहार केलेले दागिने शहरातील चिपळूण अर्बन बँक, मुथ्थूट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीत तारण ठेवून त्यावर कर्ज काढल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी नोटीस जारी करून तारण ठेवलेले दागिने अपहार प्रकरणातील असल्याची माहिती तिन्ही बँकांना कळवली. चिपळूण अर्बन बँकेने आपल्याकडील दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच फायनान्स कंपन्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर पाेलिसांकडे दिले.
फायनान्स कंपन्यांना दणका
मुथ्थूट फायनान्स आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीने आपल्याकडील दागिने परत करण्यास नकार देत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांनी दागिन्यांची केलेली मागणी योग्य असल्याचा निर्वाळा देत दोन्ही बँकांना अपहार प्रकरणातील दागिने पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते.