Ratnagiri: पावसामुळे खेड-दापोली मार्गांवर दोन ठिकाणी रस्ता बंद, संगमेश्वरात महामार्गावर चिखल अन् खड्डे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 18:48 IST2025-05-26T18:46:54+5:302025-05-26T18:48:14+5:30
खेड : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड-दापोली या प्रमुख मार्गावर फुरुस तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू ...

Ratnagiri: पावसामुळे खेड-दापोली मार्गांवर दोन ठिकाणी रस्ता बंद, संगमेश्वरात महामार्गावर चिखल अन् खड्डे
खेड : गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खेड-दापोली या प्रमुख मार्गावर फुरुस तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
खेड - दापोली मार्गाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या मार्गातील फुरूस गावात एक मोरी खचल्याने, तसेच साखरोळी गावानजीक रस्त्यावरून दोन ते तीन फूट पाणी वाहू लागल्याने व काही प्रमाणात रस्ताही खचल्याने अनेक वाहने रखडली हाेती. काही वाहनचालकांनी आपली वाहने पुन्हा परतून दापोली पालगडमार्गे मंडणगड गाठले.
गेल्या काही महिन्यांपासून खेड-दापोली या मार्गाचे काम रखडलेले आहे. दरम्यान, यावर्षी पावसाने मे महिन्याच्या २० तारखेला सुरुवात केल्याने ही कामे अपूर्ण राहिली आहेत. या अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना तसेच या मार्गावरील असलेल्या गावातील ग्रामस्थांना मोठा फटका बसला आहे.
संगमेश्वर येथे महामार्गावर चिखल अन् खड्ड्यांचे साम्राज्य
रत्नागिरी : कोकणवासीय आणि कोकणात जाणारे चाकरमानी यांच्या प्रवासातील हाल-अपेष्टा अद्यापही संपलेल्या नाहीत. १२ वर्षे झाली तरी मुंबई- गोवा महामार्गाचे काम पूर्ण झाले नाही. माणगाव, इंदापूरसोबतच मागील वर्षभरापासून संगेमश्वर येथेही चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे संगमेश्वर येथे महामार्गावर भात लावणीसारखा लाल मातीचा चिखल तयार झाला आहे. त्यात इतके भलेमोठे खड्डे आहेत, की बऱ्याच गाड्या जमिनीला लागत आहेत. दोन्ही दिशांकडील मार्गिकांवर शनिवारी आणि रविवारी संगमेश्वर येथे साधारणपणे १ तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे संगमेश्वरमध्ये अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे, तसेच खड्डेही पडले आहेत. त्यामुळे गाड्यांचे नुकसान हाेत आहे. बऱ्याच ठिकाणी वाहतूक वळवण्याचे बोर्ड नसल्याने रात्रीच्या वेळी गाडी चालवताना चालकांना प्रचंड त्रास होत असून, हे अपघातांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरत आहे. काही ठिकाणी अचानक दुहेरी वाहतूक मार्ग एकेरी केला गेला असला तरी त्याचे सूचना फलक लावले नाहीत. त्यामुळे अचानक समोरून गाडी आल्यावर चालकांची तारांबळ उडत आहे. यामुळेही अपघात घडत आहेत.