परतीच्या पावसाने भात, नागली, भाजीपाला पिके बाधित; रत्नागिरीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:14 IST2025-10-15T18:13:40+5:302025-10-15T18:14:03+5:30
लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका

संग्रहित छाया
रत्नागिरी : सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाने जाता जाता राज्याला मोठा दणका दिला. रत्नागिरी जिल्ह्यालाही त्याचा मोठा फटका बसला. या अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, भाजीपाला पिके बाधित झाली. जिल्ह्यातील एकूण १,१४८ शेतकऱ्यांच्या १०३.१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ लाख २९९ रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील लांजा आणि राजापूर वगळता अन्य सर्व तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.
सप्टेंबरमध्ये राज्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. विदर्भ, मराठवाडा या भागात तर प्रचंड नुकसान झाले. तुलनेने त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात कमी पाऊस पडला. मात्र, जितका पाऊस पडला त्याने शेतीला दणका दिला आहे. जिल्ह्यात भात, नाचणी, भाजीपाला पिकांचे पावसामुळे नुकसान झाले. तयार भात पावसाच्या जोराने जमिनीवर कोसळले. काही ठिकाणी भात दोन, चार दिवस पावसात राहिल्यामुळे भाताला अंकुरही आले. भाजीपाला कुजला आहे. नाचणीही पावसामुळे जमिनीवर पडून पाण्यात भिजून कुजली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात खरीप हंगामात एकूण ८१ हजार ९५५.६६ हेक्टर क्षेत्रांवर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वाधिक भात लागवड असून, ती एकूण ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रात, तर नाचणी लागवड १०,२३६.३५ हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. सर्वाधिक नुकसान नाचणी पिकाचे असून, ७०.६ हेक्टर क्षेत्रांवरील नाचणी बाधित झाली आहे. भात पिकाचे ३०.९९ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
भाजीपाला पिकाचे ०.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांचे १३ लाख २९९ रुपयांचे नुकसान असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय शेतकरी संख्या, बाधित क्षेत्र, आर्थिक नुकसान पुढीलप्रमाणे
तालुका - शेतकरी संख्या - बाधित क्षेत्र - आर्थिक नुकसान
मंडणगड - ७३ - ६.९८ - ०.८३
दापोली - ४८४ - २८.१७ - ५.१७५
खेड - ४२ - ७.६५ - ०.६९१
चिपळूण - ८६ - १६.७२ - १.५९
गुहागर - ४३३ - ४०.९७ - ४.६७
संगमेश्वर - १८ - १.६८ - ०.२२३
रत्नागिरी - १२ - ०.८४ - ०.१२
लांजा - ०० - ००० - ०००
राजापूर - ०० - ०० - ००
सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात बाधित झालेल्या पिकांचे नुकसान करून शासनाला अहवाल सादर करण्यात आला आहे. भात, नाचणी, भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून सर्वाधिक नुकसान नाचणी पिकाचे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनस्तरावरून नुकसानभरपाई मिळणार आहे. - शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, रत्नागिरी.