खळबळजनक! चिपळुणात सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून; पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:41 IST2025-08-07T15:40:42+5:302025-08-07T15:41:26+5:30
एकजण ताब्यात, ठसे तज्ज्ञांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण

खळबळजनक! चिपळुणात सेवानिवृत्त शिक्षिकेचा खून; पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
चिपळूण : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय-६३) या विधवा महिलेचा पाय बांधलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन जलदगतीने तपास सुरु केला आहे. श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. आज, गुरुवारी सकाळी धामणवणे खोतवाडी चिपळूण येथे घटना उघडकीस आली.
श्वानने मृतदेहाजवळून धामनवणे रस्त्याने थेट डोंगरावरील एका फार्महाऊसपर्यंत धाव घेतली, त्यामुळे मारेकरी जंगलाच्या दिशेने पळाल्याचा अंदाज असून हा खून असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून या प्रकरणी एका जवळच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा खून कोणी आणि कशासाठी केला याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मूळच्या गोंधळे येथील रहिवासी वर्षा जोशी या जिल्हापरिषद शाळेत शिक्षिका होत्या. त्यांच्या पतीचे २०११मध्ये निधन झाले होते. वर्षा जोशी या ६ वर्षांपूर्वीच जिल्हा परिषद शाळेतून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. धामणवणे खोतवाडी येथील घरी त्या एकट्याच राहत होत्या. गुरुवारी मैत्रणींबरोबर हैद्राबाद विठापूर येथे ट्रिपसाठी जाणार होत्या. त्यासाठी त्यांनी सर्व तयारी देखील केली होती. बुधवार पर्यंत त्या सर्वांच्या संपर्कात होत्या. परंतु बुधवारी रात्री नंतर त्यांचा संपर्क झाला नाही.
बुधवारी रात्री वर्षा जोशी यांना त्यांच्या मैत्रीण तोरस्कर या सतत फोन करत होत्या, परंतु कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता अखेर त्यांनी वर्षा जोशी यांचे शेजारी शिरीष चौधरी यांना फोन केला व माहिती घेण्यास सांगितले, परंतु त्यांचा दर्शनी दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे संशय बळावला आणि शेजारी तसेच येथील सरपंच यांनी मागील दरवाजा बघितला असता तो उघडा होता. शेजारी घरात जाताच हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.