जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उत्तर रत्नागिरीतून मिळणार, महिलांसाठी २७ गट आरक्षित; सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:56 IST2025-10-14T15:55:58+5:302025-10-14T15:56:25+5:30
पक्षापक्षांमध्ये कुरघोडी होण्याची शक्यता

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उत्तर रत्नागिरीतून मिळणार, महिलांसाठी २७ गट आरक्षित; सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाले असून, उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे आठ गट नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर यावेळी उत्तर रत्नागिरी जिल्ह्याला हक्क असेल, हे निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या ५६ गटांसाठी सोमवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी ३८ यातील महिलांसाठी १८ गट आरक्षित करण्यात आले. ओबीसीसाठी १५ यातील महिलांसाठी ८ गट, तर अनुसूचित जातीसाठी २ यातील महिला १ आणि अनुसूचित जमातीसाठी एक गट आरक्षित करण्यात आला.
या सोडतीमध्ये दक्षिण रत्नागिरीतील संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तसेच उत्तर रत्नागिरीतील मंडणगड या पाच तालुक्यांतील जिल्हा परिषदेचा एकही गट नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झालेला नाही. उत्तर रत्नागिरीतील खेड तालुक्यातील लोटे, भरणे, विराचीवाडी, चिपळुणातील शिरगाव, अलोरे, दापोलीमधील दाभोळ, पालगड आणि गुहागरातील कोंडकारूळ हे गट नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे या गटातून निवडून आलेली महिलाच अध्यक्षपदावर विराजमान होणार, हे निश्चित आहे.
२०२२ मध्ये कार्यकाल संपलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत जाधव हे शेवटच्या सव्वा वर्षासाठी अध्यक्ष होते. त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या इतिहासात उत्तर रत्नागिरीतून गोविंदराव निकम, त्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून दापोलीचे उदय खांडके यांनी मान पटकाविला. त्यानंतर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील शंकरराव कांगणे, शांताराम जाधव, तुकाराम गोलमडे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे.
आतापर्यंत उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील रोहिणी दळवी आणि मनीषा जाधव या दोन महिला उमेदवार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या होत्या. आता येणाऱ्या जिल्हा परिषदेत उत्तर रत्नागिरीतूनच अध्यक्षपदाची दावेदार महिला पुढे येईल.
उत्तर रत्नागिरीचा वरचष्मा
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील उमेदवार बसल्यानंतर साहजिकच जिल्हा परिषदेच्या राजकारणावर उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचा वरचष्मा राहणार आहे. राजकीय पक्षांनीच जिल्ह्याचे उत्तर अणि दक्षिण असे भाग करून स्वतंत्र जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख बनविले आहेत. त्यामुळे त्या माध्यमातून पक्षापक्षांमध्ये कुरघोडी होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात १३ मतदारसंघ नागरिकांचा मागास प्रवर्ग, ७ महिलांसाठी आरक्षित
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी सोमवारी (दि. १३) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यात अनुसूचित जाती जागांसाठी ३ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १३ जागा (यात ७ जागा महिला, ६ जागा ना.मा. प्रवर्ग सर्वसाधारण) आणि सर्वसाधारणसाठी ३४ जागा यात १६ जागा महिला राखीव आणि १८ जागा सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
या नव्या आरक्षणामुळे काही सदस्यांना पुन्हा संधी मिळाली आहे, तर काही जणांचा पत्ता कट झाल्याने त्यांना आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण असल्याने आता यासाठी अनेकजण इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून असणार आहेत. निवडणूक पूर्व हालचालींनी आता वेग घेतला आहे.