कोकणात ‘केरा केरलम’वाणाच्या लागवडीसाठी शिफारस, वैशिष्ट्ये काय.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 15:31 IST2025-06-14T15:30:49+5:302025-06-14T15:31:17+5:30

उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावर

Recommendations for cultivation of Kera Keralam variety in Konkan | कोकणात ‘केरा केरलम’वाणाच्या लागवडीसाठी शिफारस, वैशिष्ट्ये काय.. जाणून घ्या

कोकणात ‘केरा केरलम’वाणाच्या लागवडीसाठी शिफारस, वैशिष्ट्ये काय.. जाणून घ्या

रत्नागिरी : कोकणात नारळाचे अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ वाणाची लागवड करण्यासाठी रत्नागिरीतील भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशाेधन केंद्राने शिफारस केली आहे. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे झालेल्या ५३ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये ही शिफारस करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन मुख्यत्वे कोकण किनारपट्टीत घेतले जाते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ पिकाखाली क्षेत्र अधिक आहे. अलीकडच्या काळात पश्चिम महाराष्ट्रात क्षेत्र विस्तार होत आहे. कोकणामध्ये पारंपरिकपणे ‘बाणवली’ या उंच माडाची लागवड आहे.

कोकण कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने सन २०११ पासून भारतामध्ये विकसित झालेल्या विविध नारळ जातींचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार नारळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या ‘केरा केरलम’ हे वाण आशादायी आढळले.

परभणी येथे झालेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीमध्ये नारळामधील ‘केरा केरलम’ या वाणाची लागवडीसाठी शिफारस केली आहे. या संशोधन कार्यात नारळ संशाेधन केंद्राचे प्रमुख डॉ. किरण मालशे, डॉ. दिलीप नागवेकर, डॉ. राजन खांडेकर, डॉ. वैभव शिंदे, डॉ. सुनील घवाळे, डॉ. संतोष वानखेडे, डॉ. पराग हळदणकर यांचे योगदान आहे.

उत्पन्नात भारत प्रथम क्रमांकावर

जगामध्ये ९० हून अधिक देशात नारळ हे पीक घेतले जाते. भारत हा जगातील एक प्रमुख नारळ उत्पादक देश आहे. भारतामध्ये नारळ पिकाखाली २१.९० लाख हेक्टर क्षेत्र असून, २१,२०७ दशलक्ष नारळ उत्पादन आहे. जगाच्या उत्पन्नाच्या एकूण ३१ टक्के उत्पन्न हे भारतात होते. भौगोलिक क्षेत्रात भारताचे स्थान १७.१५ तृतीय क्रमांकावर असले तरी उत्पन्नात प्रथम क्रमांकावर आहे.

‘केरा केरलम’ची वैशिष्ट्ये

‘केरा केरलम’ नारळाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रती माड प्रती वर्ष ११८ फळांचे सरासरी उत्पादन आहे. खोबरे प्रती नारळ १७० ग्रॅम, तेलाचे प्रमाण ६९ टक्के आहे, तसेच त्याच्या उत्पन्नामध्ये सातत्य आहे.

Web Title: Recommendations for cultivation of Kera Keralam variety in Konkan