रत्नागिरी जिल्ह्यात सतरा लाख २५ हजार सातबारा ऑनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 05:20 PM2020-02-12T17:20:46+5:302020-02-12T17:23:05+5:30

त्यासाठी सर्व तलाठी रात्रं-दिवस काम करीत आहेत. काही तलाठी तर सुटीच्या दिवशीही काम करत आहेत. जिल्ह्यात केवळ २६९ तलाठी कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे सात ते ८ हजार सातबारांच्या दुरूस्तीसह सातबारा उतारे संगणकीकृत करण्याचे कामही देण्यात आले आहे.

Ratnagiri | रत्नागिरी जिल्ह्यात सतरा लाख २५ हजार सातबारा ऑनलाईन

रत्नागिरी जिल्ह्यात सतरा लाख २५ हजार सातबारा ऑनलाईन

ठळक मुद्दे- अथक परिश्रमांमुळे १५ रूपयांत सातबारा उपलब्ध          केवळ २६९ तलाठी पार पाडली कामगिरी

रत्नागिरी : गेल्या दीड वर्षापासून जिल्ह्यात सातबारा उताऱ्याच्या संगणकीकरणाचे तसेच दुरूस्तीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील केवळ २६९ तलाठ्यांनी आत्तापर्यंत १७ लाख २५ हजार ३६५ (८२.५८ टक्के) सातबारा उतारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाईन उपलब्ध करून दिले असल्याने आता हे सातबारा उतारे ऑनलाईन पाहता येणार आहेत. आता केवळ अधिक खातेदार असलेले ३ लाख ६३ हजार ९०६ सातबारांचे संगणकीकरण शिल्लक राहिले आहे.

शासनाने राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत फेब्रुवारी २०१८मध्ये सातबारा दाखल्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले होते. त्यासाठी ‘एडिट मॉड्युल’ हे दुरूस्तीसाठी असलेले नवे सॉफ्टवेअर सर्व जिल्ह्यांना दिले. त्या माध्यमातून सातबारा दुरूस्तीचे काम सुरू झाले होते. आधीच सातबारा उताऱ्यांवर अधिक खातेदारांची नावे असलेला तसेच सर्वाधिक सातबारा उतारे असलेला जिल्हा म्हणून रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यातच खातेदारांची संख्याही अधिक असल्याने तलाठ्यांना दुरूस्ती करताना प्रचंड कसरत करावी लागत होती.

जिल्ह्यात एकूण २० लाख ८९ हजार २७१ सातबारा आहेत. सध्या यापैकी १७ लाख २५ हजार ३६५ दाखल्यांचे काम (८२.५८ टक्के) पूर्ण झाले आहे. आता केवळ ३ लाख ६३ हजार ९०६ दाखले ऑनलाईन करण्याचे काम सुरू आहे. सातबारा उताऱ्यावर अनेक खातेदार असल्याने दुरूस्तीसह ते ऑनलाईन करण्याचे काम अतिशय क्लीष्ट आहे. अनेक सातबारांवर खातेदारांची नावे जास्त असल्याने त्यात दुरूस्ती करणे तसेच ते ऑनलाईन उपलब्ध करून देणे अवघड होत आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील केवळ २६९ तलाठ्यांनी हे शिवधनुष्य पेलत १७ लाख २५ हजार ३६५ सातबारा उतारे ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी तलाठी हे जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी रात्रं-दिवस काम करीत होते. प्रत्येक तलाठ्याकडे दिवसाला सुमारे सात ते आठ हजार सातबारांचे काम देण्यात आले होते. मात्र, आता हे काम जवळपास पूर्ण होत आले असून, फेब्रुवारी २०२० अखेरीस उर्वरित ३ लाख ६३ हजार ९०६ सातबारेही डिजिटल स्वाक्षरीसह आॅनलाईन उपलब्ध होतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात अधिक खातेदार
सातबारांवर अधिक खातेदारांची नावे असलेला रत्नागिरी हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे. जिल्ह्यात एकूण २० लाख ८९ हजार २७१ सातबारा आहेत. सध्या यापैकी १७ लाख २५ हजार ३६५ सातबारा ऑनलाईन करण्याचे काम (८२.५८ टक्के) पूर्ण झाले आहे. उर्वरित  ३ लाख ६३ हजार ३६५ उताऱ्यांचे (७.४२ टक्के) काम शिल्लक असून, ते फेब्रुवारी अखेरपर्यंत करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. राजापूर तालुक्यात सर्वाधिक ३ लाख १८ हजार ९६७ तर त्या खालोखाल रत्नागिरीत ३ लाख १६ हजार ७५२ इतकी सातबारा उताऱ्यांची संख्या आहे. मंडणगड तालुक्यात ही संख्या सर्वात कमी म्हणजे १ लाख १० हजार ४४३ इतकी आहे. चिपळूण तालुक्याचे सातबारा आॅनलाईनचे काम ९६.२६ टक्के इतके झाले आहे.

जिल्ह्यात केवळ २६९ तलाठी कार्यरत
सातबारा उतारा महत्त्वाचा असल्याने नागरिकांना तो लवकरात लवकर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी दुरूस्तीचे काम वेगाने सुरू आहे. परंतु, अंतिम टप्प्यातील ७.४२ टक्के कामच अतिशय क्लिष्ट आहे. त्यासाठी सर्व तलाठी रात्रं-दिवस काम करीत आहेत. काही तलाठी तर सुटीच्या दिवशीही काम करत आहेत. जिल्ह्यात केवळ २६९ तलाठी कार्यरत आहेत. प्रत्येकाकडे सात ते ८ हजार सातबारांच्या दुरूस्तीसह सातबारा उतारे संगणकीकृत करण्याचे कामही देण्यात आले आहे.

सातबारा संगणकीकरणाला २००२पासून प्रारंभ
सातबारा संगणकीकरणाच्या कामाला २००२ साली तत्कालिन जिल्हाधिकारी जी. टी. बंदरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूवात झाली. त्यानंतर आताचे सातवे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या कारकीर्दीत हे काम पूर्ण होत आहे. दुरूस्तीबरोबरच सातबारा ऑनलाईनचे कामही एकाचवेळी सुरू आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळेच २१ लाख उतारे ऑनलाईन करण्याचे अवघड काम पूर्णत्वाला जाणार असल्याने त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष दिलीप देसाई आणि सरचिटणीस उमाकांत देशमुख यांनी धन्यवाद दिले आहेत.

Web Title: Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.