रत्नागिरी : खेडमध्ये अधिकाऱ्यानेच केला पशुधनचा अनधिकृत साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:30 IST2018-12-04T17:28:54+5:302018-12-04T17:30:49+5:30
शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी आलेल्या औषधांचा सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यानेच अनधिकृतपणे साठा करून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रत्नागिरी : खेडमध्ये अधिकाऱ्यानेच केला पशुधनचा अनधिकृत साठा
खेड : शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यासाठी आलेल्या औषधांचा सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यानेच अनधिकृतपणे साठा करून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील शिव फाटा येथील एका खासगी मालकीच्या गाळ्यात हा औषधसाठा पकडण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी विनया जंगले यांनी पंचनामा करून हा औषधसाठा सील केला आहे.
खेड तालुक्यातील शिव फाटा येथील इनरकर यांच्या मालकीचा गाळा खेड पंचायत समितीचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आर. एस. जाधव यांनी दीड वर्षापूर्वी भाड्याने घेतला होता. या गाळ्याचा उपयोग ते सिमेंट व्यवसाय करण्यासाठी करणार होते.
खेड तालुक्यातील खाडीपट्टा येथील तुंबाडमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात आर. एस्. जाधव यांची नेमणूक आहे. त्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी शासनाकडून पुरवण्यात आलेल्या औषधांचा साठा तुंबाडमध्ये दवाखान्यात न ठेवता या गाळ्यात ठेवला होता, अशी कबुली यांनी दिली आहे. त्या ठिकाणाहून ते त्या औषधांची परस्पर विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.
या गाळ्यातून विशिष्ट स्वरूपाची दुर्गंधी येत असल्याने गाळ्याचे मालक इनरकर यांना शंका आली. त्यांनी गाळा उघडून पाहिल्यानंतर औषधांचा साठा दिसला. त्यांनी या घटनेची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गुरुनाथ पारसे यांना दिल्यानंतर खेड पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी डॉक्टर विनया जंगले यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी या गावातील सरपंच, पोलीसपाटील तसेच इतर प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर पंचनामा केला.