मनी लाँड्रिंगची भीती दाखवून ६१ लाख रुपये लुटणाऱ्यास दिल्लीत अटक, रत्नागिरी सायबर पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 15:35 IST2025-06-02T15:35:23+5:302025-06-02T15:35:48+5:30

चार दिवसांची पाेलिस काेठडी

Ratnagiri Police arrests accused in Delhi for robbing senior citizen of Rs 61 lakh online fearing money laundering | मनी लाँड्रिंगची भीती दाखवून ६१ लाख रुपये लुटणाऱ्यास दिल्लीत अटक, रत्नागिरी सायबर पोलिसांची कामगिरी

मनी लाँड्रिंगची भीती दाखवून ६१ लाख रुपये लुटणाऱ्यास दिल्लीत अटक, रत्नागिरी सायबर पोलिसांची कामगिरी

रत्नागिरी : बँक खात्यातून दोन कोटींचा मनी लाँड्रिंग व्यवहार झाल्याची भीती घालत एका ज्येष्ठ नागरिकाचे ६१ लाख १९ हजार ८० रुपये ऑनलाइन लुटणाऱ्या आरोपीला रत्नागिरीपोलिसांनीदिल्लीपोलिसांच्या मदतीने बेड्या ठाेकल्या . राजीव विश्वनाथ तिवारी (४७, रा. नाका, शिवनगर कॉलनी, पहाड गंज, फैजाबाद, उत्तर प्रदेश, सध्या रा. दिल्ली) असे त्याचे नाव आहे.

राजीव तिवारी याने मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन विभागातून बोलत असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाला सीमकार्ड बंद होणार आहे अशी भीती घालत पोलिसांकडे तक्रारीकरिता कॉल फॉरवर्ड करत असल्याचा बहाणा केला. यावेळी त्याच्यासाेबत असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून फिर्यादी यांचे कॅनरा बँकेत खाते उघडण्यात आलेले आहे आणि या खात्यामधून दोन कोटी रुपयांचा मनी लाँड्रिंगचा व्यवहार झाल्याची भीती घातली.

यावेळी फिर्यादी यांना त्या बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यास भाग पाडत ६१ लाख १९ हजार ०८० रुपयाचा गंडा घातला. फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच फिर्यादी यांनी रत्नागिरी सायबर पोलिस स्थानकात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून राजीव तिवारी याला अटक केली.

ही कामगिरी सायबर पोलिस स्थानकाच्या प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्मिता सुतार, हवालदार रामचंद्र वडार, काॅन्स्टेबल रोहन कदम, रामदास पिसे, हवालदार संदीप नाईक, रमिज शेख यांनी बजावली.

चार दिवसांची पाेलिस काेठडी

फसवणुकीच्या आर्थिक व्यवहारांबाबत बॅंकांकडून प्राप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे राजीव तिवारी दिल्ली येथे असल्याचे निष्पन्न झाले. दिल्ली येथे तपास पथक पाठवून कोणत्याही प्रकारचे मोबाइल लोकेशन प्राप्त नसताना खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेतले. त्याला रत्नागिरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Ratnagiri Police arrests accused in Delhi for robbing senior citizen of Rs 61 lakh online fearing money laundering