रत्नागिरी : तळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभव, लघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:36 IST2018-09-24T14:31:50+5:302018-09-24T14:36:13+5:30
लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.

रत्नागिरी : तळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभव, लघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया
पाचल : लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.
सन २००६मध्ये या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पाच ते सहा वर्षांतच या धरणाला गळती सुरू झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा साठा होत नाही. जानेवारीनंतर या धरणात पाण्याचा ठणठणाट असतो. धरण असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.
आजही या धरणातून दिवसाला लाखो लीटर पाणी वाहून जात आहे. याकडे प्रशासन वा लोकप्रतिनिधींचे लक्ष नसते. त्यामुळे हे धरण सुमारे सतरा वर्षे वापराविना पडून आहे. लघु पाटबंधारे विभागाचे या धराणाच्या दुरूस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे या धरणावर झाडेझुडपे वाढली असून, मोठ्या प्रमाणात गवतही वाढले आहे.
तळवडे धरणाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर सध्या सुरू असलेल्या गळतीच्या जागी मोठी गळती होऊन पावसाळ्यात या धरणाला मोठा संभवतो. या धरणाच्या पायथ्याशी सुमारे हजार ते पंधराशे लोकवस्ती असून, याचे गांभीर्य लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. या धरणाला धोका निर्माण झाल्यास नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल होत आहे.