रत्नागिरी जिल्ह्याचा साडेनऊ कोटींचा टंचाईकृती आराखडा मंजूर, किती गावांना पाणीटंचाईची झळ बसणार.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:55 IST2025-03-22T17:54:49+5:302025-03-22T17:55:45+5:30
विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली

संग्रहित छाया
रत्नागिरी : जिल्ह्याच्या ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांच्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सादर करण्यात आलेल्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. या आराखड्यानुसार ३५७ गावांतील ७२२ वाड्यांना टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे.
गतवर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील भूजलपातळीत वाढ झाली होती. जिल्ह्यात फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने तलाव, विहिरी आणि विंधन विहिरींच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली आहे. कडक उन्हामुळे टंचाई निवारण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्याच्या एकूण आराखड्यात ९ कोटी ४९ लाख ७० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरवर्षी जिल्हा परिषदेकडून सादर करण्यात येणाऱ्या टंचाई कृती आराखड्यातील रकमेमध्ये काटछाट करून त्याला मंजुरी देण्यात येते. मात्र, यंदाच्या आराखड्याच्या रकमेत काहीही बदल न करता त्याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे.
टंचाई कृती आराखड्यामध्ये तरतूद
- नवीन विंधन विहिरी : ९६ गावे, १८४ वाड्या, २ कोटी २० लाख ८० हजार
- विंधन विहीर दुरुस्ती : २४ गावे, ५२ वाड्या, ३१ लाख २० हजार
- नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती : ३९ गावे, ५९ वाड्या, ५९ योजना, ४ कोटी १३ लाख ५० हजार
- तात्पुरत्या पूरक नळपाणी पुरवठा योजना : ११ गावे, १९ वाड्या, १९ योजना, ९८ लाख १० हजार
- विहीर खोल करणे, गाळ काढणे : ५१ गावे, ९८ वाड्या, ९० लाख ७० हजार
- खासगी विहीर अधिग्रहण करणे : ५ गावे, ६ वाड्या, ३ लाख
- टँकरने पाणीपुरवठा : १३१ गावे, ३०४ वाड्या, ९२ लाख ४० हजार