जप्त मासेमारी बोट, डिझेल टँकरचा होणार लिलाव, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:24 IST2025-05-07T16:24:24+5:302025-05-07T16:24:43+5:30
रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी जप्त करण्यात आलेली डिझेल टँकर व मासेमारी बोटचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार ...

जप्त मासेमारी बोट, डिझेल टँकरचा होणार लिलाव, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश
रत्नागिरी : डिझेलच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी जप्त करण्यात आलेली डिझेल टँकर व मासेमारी बोटचा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या आदेशानुसार इसेन्शिअल कमोडिटी ॲक्ट १९५५ अंतर्गत लिलाव करण्यात येणार आहे. हा लिलाव ९ रोजी सकाळी ११:३० ते दुपारी १ या वेळेत दाभोळ सागरी पोलिस स्थानक येथे होणार आहे.
लिलावासाठी मालमत्तेचे मूळ मूल्यांकन मासेमारी बोटीकरिता मत्स्य व्यवसाय विभाग आणि डिझेल टँकर करिता प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. लाकडी व फायबर मासेमारी बोट (आयएनडी-एमएच-३-एमएम-६८५८)चा लिलाव हाेणार असून अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) ९ लाख ४१ हजार ६१८ रुपये आहे. ही मासेमारी बोट सध्या दाभोळ बंदर येथे ठेवण्यात आलेली आहे.
तसेच डिझेल टँकर (एमएच ४६, बीएम ८४५७) चा लिलाव करण्यात येणार आहे. हा टॅंकर २०१९मधील असून, अंदाजित मूल्य (बाजारभावानुसार) १४.७५ लाख रुपये इतका आहे. सध्या हा टँकर दाभोळ पोलिस स्थानकात ठेवण्यात आलेला आहे.
हा लिलाव ‘जशी आहे, तशी स्थिती’ या तत्त्वावर करण्यात येईल. सहभागी होणाऱ्यांनी लिलावापूर्वी दहा हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल. यशस्वी बोलीदाराने लिलावास्थळी एकूण बोलीच्या २५ टक्के रक्कम धनादेशाद्वारे तत्काळ व उर्वरीत रक्कम धनादेशाद्वारे सात दिवसात भरावी लागेल.
जिल्हाधिकारी यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही बोली नाकारण्याचा व लिलाव रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. सर्व सहभागींनी वैध ओळखपत्र (पॅनकार्ड/आधारकार्ड) व दोन पासपोर्ट साइज फोटो आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी किंवा lcb.ratna@mahapolice.gov.in येथे संपर्क साधावा.