राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; अणुस्कुरा घाटात दरड कोसळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 10:50 IST2025-08-19T10:49:24+5:302025-08-19T10:50:05+5:30
मुसळधार पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत

राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा; अणुस्कुरा घाटात दरड कोसळली
विनोद पवार
राजापूर : गेले आठवडाभर संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासूनच जोर धरल्याने मंगळवारी पहाटे राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. पुराचे पाणी जवाहर चौकातील राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत पोहोचले असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळकडे जाणारा मार्गही पाण्याखाली गेला आहे. तर व्यापाऱ्यांनी दुकानाती साहित्य सुरक्षितस्थळी हलवला आहे.
सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन कोदवली नदीचे पाणी शहर बाजारपेठेत शिरले आहे. शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, चिंचबांध, आंबेवाडी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. शहरातील शिवाजी पथ रस्ता पूर्णत: पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील व्यापाऱ्यांनी व रहिवाशांनी साहित्य सुरक्षितस्थळी नेले आहे.
मुसळधार पावसाने तालुक्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी सकाळी साडेसहाच्या दरम्यान अणुस्कुरा घाटात दरड कोसळली. त्यामुळे घाटमाथ्यावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. प्रशासनाने या ठिकाणी तात्काळ यंत्रणा पाठवून दरड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.