रत्नागिरीत पावसाने घेतली विश्रांती, आठवडाभरानंतर झाले सूर्यदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:08 IST2025-08-22T16:08:30+5:302025-08-22T16:08:45+5:30
रत्नागिरी : गुरुवारी सकाळपासूनच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी कडकडीत ऊन पडल्याने वातावरण आल्हाददायी वाटत होते. ...

संग्रहित छाया
रत्नागिरी : गुरुवारी सकाळपासूनच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी कडकडीत ऊन पडल्याने वातावरण आल्हाददायी वाटत होते. आठवड्यानंतर नागरिकांना सूर्यदर्शन झाले. जिल्ह्यात राजापूर, खेड, चिपळूण या तालुक्यांमधील पाणी ओसरले असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. या कालावधीत पडलेल्या पावसामुळे पावसाची घटलेली आकडेवारी वाढण्यास मदत झाली.
१३ ऑगस्टपासून पावसाने जिल्हाभरात संततधार धरली होती. सलग सुरू झालेल्या या अतिवृष्टीमुळे राजापूर, चिपळूण, खेड आदी तालुक्यांना अधिक फटका बसला. तेथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. पावसाची दिवसरात्र संततधार सुरू होती. जोडीला वाऱ्याचा जोर असल्याने अनेक घरांचे, गोठ्यांचे तसेच इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रस्ते खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्येही वाढ झाली होती. दरडप्रवण आणि पूरप्रवण भागातील ४४ कुटुंबांतील ११७ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.
गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. त्यानंतरही काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम व हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४४२ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७२.५८ टक्के पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.