रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचीबदली प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे सुरू झाली आहे. मात्र, इतर जिल्ह्यातील काही शिक्षक न्यायालयात गेल्याने बदली प्रक्रिया थांबली होती. मात्र, नवीन संचमान्यतेला न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे शिक्षक बदल्यांसाठी जुन्या संचमान्यतेनुसार रिक्त पदांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार शिक्षकांची बदली प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे जून महिन्यात शिक्षकांच्या बदल्या हाेणार आहेत.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या सुरू झालेल्या प्रक्रियेनुसार बदली पोर्टलवर भरलेली माहिती दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अवघड क्षेत्रातून बाहेर पडण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांना यानिमित्ताने संधी मिळाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जून महिन्याचा पंधरवडा उजाडणार आहे. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरच बदल्यांच्या ठिकाणी शिक्षकांना रूजू व्हावे लागणार आहे.जिल्ह्यात सध्या एक हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जुन्या संचमान्यतेप्रमाणे प्रत्येक तालुक्यात बदल्यांसाठी समानीकरणांतर्गत १४ टक्के जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार बदलीपात्र शाळांची यादी व शिक्षकांची यादी तयार केली जाणार आहे. संवर्ग १, २, ३, ४ आणि ५ नुसार बदली प्रक्रिया होणार आहे.मागील बदली वेळी एक हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्याप्रमाणे यावर्षीही तितक्याच बदल्या होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षकांनी भरलेली माहिती दुरुस्तीसाठी बदली पोर्टल खुले करण्यात आले आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात इच्छुक शाळांची नावे भरून घेतली जातील आणि पुढील प्रक्रिया होईल. दरम्यान, उन्हाळी सुट्यांचा कालावधी १६ जूनला संपत आहे. तोपर्यंत बदली प्रक्रिया सुरू होणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. नव्या शैक्षणिक वर्षात जून महिन्यात मुसळधार पावसात शिक्षकांच्या बदल्या होणार असल्याने शिक्षकांची धावपळ होणार आहे.
सुगम शाळेत येण्याची संधी अवघड क्षेत्रातील शाळांसाठी २०२२ ला तयार केलेली यादी जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे तयार आहे. त्यामध्ये ६५० शाळांचा समावेश आहे. या बदल्यांमध्ये तयार असलेली ही यादी घेण्यात येणार आहे. बदल्यांमुळे अवघड क्षेत्रातील शिक्षकांना सुगम क्षेत्रातील शाळांमध्ये येण्याची संधी मिळणार आहे.
संवर्ग-१अपंग, विधवा, कुमारिका, गंभीर आजार असलेले, ५३ वर्षे पूर्ण असलेले, मूल अपंग, जोडीदार अपंग, आजी-माजी सैनिक पत्नी.संवर्ग -२पती-पत्नी एकत्रीकरण.