Ratnagiri: मंडणगडात गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा नातेवाइकांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 12:38 IST2025-05-13T12:38:23+5:302025-05-13T12:38:53+5:30
मंडणगड : तालुक्यातील कुडुक बुद्रुक गावातील गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. विधी संदेश सावणेकर (३२) ...

Ratnagiri: मंडणगडात गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू, वेळेत उपचार न मिळाल्याचा नातेवाइकांचा आरोप
मंडणगड : तालुक्यातील कुडुक बुद्रुक गावातील गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. विधी संदेश सावणेकर (३२) असे या महिलेचे नाव आहे. मंडणगड ग्रामीण रुग्णालयातून पुढील उपचाराला नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आराेप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.
तालुक्यातील कुडुक बुद्रुक येथील विधी सावणेकर या मुंबई येथे राहतात. काही दिवसांपूर्वीच त्या सासरी आल्या होत्या. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने नातेवाइकांनी त्यांना देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले हाेते. तिथे उपचार करून पुढील उपचाराकरिता मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात महिलेची प्रकृती अस्वस्थ बनल्याने तिला अधिक उपचाराकरिता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला.
मात्र, पुढील उपचारासाठी नेण्यासाठी रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. १०८ वर फोन केला असता ही रुग्णवाहिका दापोली येथे रुग्ण घेऊन अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर १०२ ही रुग्णवाहिका देण्यात आली नाही. त्यामुळे महिलेच्या कुटुंबीयांनी खासगी रुग्णवाहिका घेऊन दापोलीला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, रस्त्यातच प्रवासादरम्यान बाळासह महिलेचा मृत्यू झाला. वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत, असा आराेप महिलेच्या नातेवाइकांनी केला आहे.
वैद्यकीय अधिकारी म्हणतात, माहिती घेतो
यासंदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता या प्रकाराबाबत माहिती घेऊन अधिक माहिती देतो, असे सांगण्यात आले. तसेच साेमवारी या प्रकाराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा माेबाइल बंद हाेता.