Ratnagiri: प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:10 IST2025-12-24T15:09:37+5:302025-12-24T15:10:22+5:30
पालकमंत्री उदय सामंत यांनीही दखल घेत कोकणातील निसर्गाला धक्का बसणार असेल तर सरकार कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी देणार नाही, असे जाहीर केले

Ratnagiri: प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष्मी ऑरगॅनिकमध्ये पाहणी
चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीबाबत सोशल मीडियावर जे वादळ उठले आहे, त्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चौकशी पथक कंपनीत पाठवण्यात आले. या पथकाने कंपनीची पाहणी केली असून, ते लवकरच अहवाल देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याविषयी अधिक गोपनीयता बाळगली जात असल्याने अधिकृत माहिती अद्याप पुढे आलेली नाही.
प्रदूषणाच्या कारणास्तव बंद पाडण्यात आलेल्या इटलीतील मिटेनी कंपनीतील उपकरणे, तंत्रज्ञान आणि पेटंट्स भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी करून लोटे येथे आणली आहेत. सोशल मीडियावरून त्याविषयीचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्याबाबत उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही दखल घेत कोकणातील निसर्गाला धक्का बसणार असेल तर सरकार कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी परवानगी देणार नाही, असे जाहीर केले आहे.
या एकूणच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेत मुख्यालयातून सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक कंपनीत पाठवले. सोमवारी या सहा अधिकाऱ्यांनी कंपनीतील यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स याच्यासह परवाने यांची तपासणी केली. हे पथक आता आपला अहवाल सादर करणार आहे. मात्र या पथकाने केलेल्या पाहणीबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.