रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाप्रकरणी प्लॉट मालकाला अटक, संशयित नेपाळी महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 12:01 IST2025-09-20T12:00:16+5:302025-09-20T12:01:12+5:30
प्लॉट मालकाला बजावणार नाेटीस

रत्नागिरीतील देहविक्री व्यवसायाप्रकरणी प्लॉट मालकाला अटक, संशयित नेपाळी महिलेला दोन दिवसांची पोलिस कोठडी
रत्नागिरी : शहरानजीकच्या मिरजोळे-एमआयडीसी येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी संशयित नेपाळी महिला गेल्या ४ महिन्यांपासून वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, दाेन दिवसांची पोलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. तर प्लॉट मालक सुनीलकुमार गणपत प्रभू (वय ६०) यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली.
एमआयडीसी येथील ई-६९ या प्लॉटवर देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पाेलिसांनी या ठिकाणी छापा टाकून देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला. त्यावेळी संशयित नेपाळी महिलेला पाेलिसांनी अटक केली. ती पुणे येथील दोन महिलांकरवी हा देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या दोन महिलांची पाेलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता केली.
संशयित नेपाळी महिलेविरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ कायद्यांतर्गत गुन्हा करण्यात आला हाेता. तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी प्लाॅट मालकाला शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली असून, पाेलिसांकडून अधिक चाैकशी सुरू आहे.
प्लॉट मालकाला बजावणार नाेटीस
दरम्यान, पाेलिसांनी छापा टाकलेला प्लॉट हा सुनीलकुमार गणपत प्रभू यांच्या नावावर आहे. त्यांना ताे १९९१ मध्ये इंडस्ट्रीज वापरासाठी विक्री करण्यात आला हाेता. मात्र, याठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय हाेत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्यानंतर महाराष्ट्र औद्याेगिक विकास महामंडळाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी प्लाॅट मालकाला मंडळाकडून नाेटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.