फाेटाे ओळी - भारतीय जनता पार्टीचे मंडणगड तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सचिन थोरे, रविकुमार मिश्रा, गिरीश जोशी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांना रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन सादर केले.
...........................
लाेकमत न्यूज नेटवर्क
मंडणगड : खेड-पुरार राज्य मार्गावर केळवत घाट ते दुधरे गाव या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित मार्गी लावावे, या मागणीसाठी मंडणगड तालुका भाजपतर्फे तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या वेळी तालुकाध्यक्ष विश्वदास लोखंडे, सरचिटणीस गिरीश जोशी, उपाध्यक्ष महेश दळवी, माजी तालुका अध्यक्ष सचिन थोरे, रविकुमार मिश्रा, शहर अध्यक्ष पुष्पराज कोकाटे, काजल लोखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
खेड-पुरार राज्य मार्गावर केळवत घाट ते दुधरे दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिलेला नाही. खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. काम सुरू न केल्यास आंदोलनाची भूमिकाही निवेदनात मांडण्यात आली आहे.