वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनाला रत्नागिरीत विरोध, सकल हिंदू समाजाने मांडली भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 14:00 IST2024-10-07T13:59:44+5:302024-10-07T14:00:53+5:30
भाजपचाही विरोध

संग्रहित छाया
रत्नागिरी : केंद्र सरकाराने वक्फ बोर्डाच्या संदर्भात घटना दुरुस्तीसाठी भारतीय नागरिकांकडून लेखी सूचना मागवल्या होत्या. हे विधेयक संसदेत प्रलंबित आहे, असे असताना रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय सुरू होत असल्याबद्दल सकल हिंदू समाजाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उद्घाटनापूर्वीच हे कार्यालय वादात सापडले आहे.
रत्नागिरीत वक्फ बाेर्ड कार्यालयाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये साेमवारी करण्यात येणार आहे. या उद्घाटनाला सकल हिंदू समाजाने विराेध केला आहे. या पत्रकार परिषदेला चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे व विराज चव्हाण उपस्थित हाेते.
शिरगाव (ता. रत्नागिरी), पन्हळे (ता. राजापूर) आणि रत्नागिरीतील टिळक ग्रंथालयासह अन्य ठिकाणी अनधिकृत धर्मस्थळे बांधली जात आहेत. याची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. जमिनी ताब्यात घेऊन भारताला इस्लामिक देश बनवण्याचा वक्फ बोर्डाचा हेतू दिसतो. शांत रत्नागिरीत असे घडत असेल तर त्याचा जाहीर निषेध नोंदवतो, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना सकल हिंदू समाजातर्फे भेटून निवेदन देण्यात येणार आहे. आमचे आंदोलन संविधानिक मार्गाने करण्यात येणार आहे, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आमचा कुठल्या धर्माला किंवा पंथाला विरोध नाही. आम्ही राजकीय पक्षाचेही समर्थन करत नाही. परंतु, हिंदूंचे हित जो जपेल त्यालाच आम्ही मतदान करणार आहोत, असे चंद्रकांत राऊळ यांनी सांगितले.
भाजपचाही विरोध
आम्ही राज्य सरकारमध्ये सहभागी असलो, तरी केंद्र सरकारने वक्फ बोर्डाबाबत बदल करण्यासाठी सूचना, हरकती मागविल्या आहेत. तरीही रत्नागिरीत कार्यालय सुरू करण्याचा घाट का घातला गेला. त्यामुळे भाजपा म्हणून आमचा या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाम विरोध राहील, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले.