Ratnagiri News: एसटी बसच्या चाकाखाली अचानक आला मोठा आवाज, बघितलं तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:30 IST2023-02-03T13:29:40+5:302023-02-03T13:30:04+5:30
वृद्धा बसखाली आली कशी, हे कळू शकले नाही

Ratnagiri News: एसटी बसच्या चाकाखाली अचानक आला मोठा आवाज, बघितलं तर..
गुहागर : नवानगर येथून गुहागरकडे जाणाऱ्या एसटीच्या बसखाली सापडून वृद्धा ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या दरम्यान नवानगर (ता. गुहागर) येथे घडली. मालती विठू राेहिलकर (७०, रा. नवानगर माेहल्ला, गुहागर) असे वृद्धाचे नाव आहे.
याबाबत गुहागर आगारप्रमुख वैभव कांबळे यांनी पाेलिसांना माहिती दिली. चालक चंद्रकांत लक्ष्मण सकपाळ हे गुहागर-वेलदूर (एमएच १४, बीपी २९७०) ही गाडी गुहागर आगारातून सकाळी ९ : ३० वाजता घेऊन निघाले. गाडीत विनय विठ्ठल पवार वाहक म्हणून हाेते. ही बस नवानगर येथून १०:१५ गुहागरकडे येण्यासाठी निघाली.
या गाडीत ३० विद्यार्थी व आठ प्रवासी हाेते. नवानगर बसथांब्यावरून सुटल्यानंतर गाडीच्या चाकाखाली काहीतरी सापडल्याचा चालकाला आवाज आला. चालक चंद्रकांत सकपाळ व वाहक विनय पवार यांनी गाडी थांबवून पाहिले. यावेळी गाडीखाली सापडून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तत्काळ गुहागर पाेलिस स्थानकात याबाबत माहिती दिली. पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, ही वृद्धा बसखाली कशी आली, हे कळू शकलेले नाही. याबाबत गुहागर पाेलिस स्थानकात नाेंद करण्यात आली असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.