‘जीडीसी अँड ए’ परीक्षेसाठी आता रत्नागिरीतही केंद्र, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायी निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:31 IST2026-01-09T18:31:05+5:302026-01-09T18:31:05+5:30
कोकण विभागात यापूर्वी ठाणे हे एकमेव परीक्षा केंद्र होते

‘जीडीसी अँड ए’ परीक्षेसाठी आता रत्नागिरीतही केंद्र, कोकणातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायी निर्णय
रत्नागिरी : सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘शासकीय सहकार व लेखा पदविका’ (G.D.C.& A.) आणि ‘सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र’ (C.H.M.) परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. २६ ते २८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षांसाठी आता पहिल्यांदाच रत्नागिरी येथे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते २३ फेब्रुवारी अशी आहे.
कोकण विभागात यापूर्वी ठाणे हे एकमेव परीक्षा केंद्र होते. त्यामुळे कोकणातील इतर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ठाण्याला जावे लागत असे. मात्र, मे २०२६ च्या परीक्षेसाठी संगणक प्रणालीमध्ये ‘रत्नागिरी’ हे १७ वे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडसाठी पहिल्यांदाच कोणतीही पदवी असलेल्या इच्छुक व्यक्तींना ही परीक्षा देण्यासाठी रत्नागिरी येथे सुविधा उपलब्ध झाली आहे.
२६, २७ व २८ मे या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत ९ जानेवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे. https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावेत. रत्नागिरी येथे केंद्र उपलब्ध झाल्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करताना केंद्राच्या रकान्यात ‘रत्नागिरी’ या केंद्राची नोंद करावी, असे आवाहन केंद्रप्रमुख तथा जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. तसेच साहेबराव पाटील (सहायक निबंधक- प्रशासन), लक्ष्मीकांत केतकर यांच्याशी संपर्क करावा. कोकणातील परीक्षार्थींसाठी सुरू करण्यात आलेल्या रत्नागिरी केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.