चिपळुणातील १९ सावकारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:04+5:302021-07-02T04:22:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : सावकारीविषयी जनप्रक्षोभ सुरू होताच संबंधित यंत्रणेने गंभीर दखल घेतली आहे. सावकारी प्रकरणावरून गुन्हा दाखल ...

Notice to 19 lenders in Chiplun | चिपळुणातील १९ सावकारांना नोटीस

चिपळुणातील १९ सावकारांना नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : सावकारीविषयी जनप्रक्षोभ सुरू होताच संबंधित यंत्रणेने गंभीर दखल घेतली आहे. सावकारी प्रकरणावरून गुन्हा दाखल झालेल्या दोघांचा परवाना आता रद्द होण्याची शक्यता आहे. सहायक निबंधक कार्यालय तसेच चिपळूण पोलिसांकडून तसा अहवाल जिल्हा पातळीवर पाठवण्यात आला असून, कारवाईची प्रक्रियाही सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती येथील सहायक निबंधक कार्यालयाकडून देण्यात आली.

येथे सावकारी व्यवसायाला प्रचंड ऊत आला होता. ५० हून अधिक जण या व्यवसायात सक्रिय होऊन बक्कळ व्याजाची पठाणी वसुली करीत होते. शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी आलिशान कार्यालये थाटून वसुलीचे पठाणी पॅटर्न वापरतानाच कर्जदाराला धमक्या, मारहाण, अश्लील शिवीगाळ, प्रॉपर्टी किंवा वाहने जप्त करणे इथपर्यंत सावकारांची मजल गेली होती. शहरातील रिक्षाचालक अभिजित गुरव याने आत्महत्या केली आणि हा सावकारीचा बळी असल्याचे पुढे आले. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. आता अनेक तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत.

शहरातील एका महिलेने तीन सावकारांविरोधात मारहाण तसेच शारीरिक, मानसिक छळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद चिपळूण पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार पूजा मिरगल, शिवा खंडजोडे आणि चांगदेव खंडजोडे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. लोकांमधून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर चिपळूण येथील सहायक निबंधक कार्यालयानेही या एकूणच प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांपैकी शिवा खंडजोडे तसेच चांगदेव खंडजोडे हे सावकारी परवानाधारक असल्याने त्यांच्यावर थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या दोघांनी शासकीय सावकारी नियमांचा भंग करून बेकायदा वसुली करून कर्जदाराला मानसिक तसेच शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी त्यांचे परवाने रद्द करण्याचा अहवाल येथील सहायक निबंधक कार्यालयाने जिल्हा पातळीवर पाठिवला आहे.

Web Title: Notice to 19 lenders in Chiplun