Ratnagiri: गुहागर ग्रामीण रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याची नातेवाईकांची तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 13:15 IST2025-12-17T13:12:20+5:302025-12-17T13:15:16+5:30
तक्रारीबाबत गुहागर ग्रामीण रुग्णालयात चाैकशी करण्यात येणार

संग्रहित छाया
गुहागर : तालुक्यातील वरवेली शिंदेवाडी येथील एका २६ वर्षीय महिलेच्या नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना गुहागर ग्रामीण रुग्णालयात मंगळवारी (१६ डिसेंबर) दुपारी घडली. नवजात बाळाचा मृत्यू वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आराेप चुलत सासरे संजय शंकर शिंदे यांनी केला असून, याबाबत त्यांनी गुहागर पाेलिस स्थानकात तक्रार दिली आहे.
संजय शिंदे यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची सून नऊ महिन्यांची गरोदर होती. मंगळवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमाराला तिच्या पोटात दुखू लागले. तिचे पती दुबई येथे व सासरे गुजरात येथे कामानिमित्त असतात. त्यामुळे संजय शिंदे यांनी तिला खासगी वाहनाने पहाटे ५:३० वाजता गुहागर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने प्रसूती व्यवस्थित होईल, असे सांगितले. मात्र, काही तासांनंतर ‘घोणसरे येथे खासगी रुग्णालयात तिला नेऊ का,’ असे विचारले असता चिपळुणातील कामथे येथील सरकारी रुग्णालयात घेऊन जाऊ शकता, असे डाॅक्टरांनी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
त्यानंतर दुपारी एक वाजता प्रसूती होऊन नवजात बालक मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, आधी प्रसूती व्यवस्थित हाेईल, असे सांगितले असता बालकाचा मृत्यू कसा झाला, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे. केवळ रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बालकाचा मृत्यू झाल्याचा आराेप त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गुहागर पाेलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास उपनिरीक्षक संदीप भोपळे करीत आहेत.
चाैकशी करणार
संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीबाबत गुहागर ग्रामीण रुग्णालयात चाैकशी करण्यात येणार आहे. सखाेल चाैकशी केल्यानंतर यामध्ये संबंधित दाेषी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती गुहागर पाेलिसांकडून देण्यात आली.