स्वप्नपूर्ती! वडील पोलीस अन् लेक झाली 'पोलीस उपनिरीक्षक', नीलम जाधवचे घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 19:54 IST2023-07-05T19:54:05+5:302023-07-05T19:54:25+5:30
निवृत्त सहाय्यक पोलिस फाैजदार विजय जाधव यांची कन्या नीलम जाधव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उप निरीक्षक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली आहे.

स्वप्नपूर्ती! वडील पोलीस अन् लेक झाली 'पोलीस उपनिरीक्षक', नीलम जाधवचे घवघवीत यश
मेहरून नाकाडे
रत्नागिरी: येथील निवृत्त सहाय्यक पोलिस फाैजदार विजय जाधव यांची कन्या नीलम जाधव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलिस उप निरीक्षक परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली आहे. महाविदयालयीन शिक्षण घेत असल्यापासून पोलिस अधिकारी बनण्याचे नीलमचे स्वप्न अखेर सत्यात उतरले आहे.
शहरातील आंबेडकरवाडी येथील विजय जाधव सहाय्यक पोलिस फाैजदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची कन्या नीलम हिचे दहावीपर्यंतचे शिक्षण रा.भा. शिर्के प्रशालेत झाले. त्यानंतर बारावी नंतर पदवी पर्यंतचे शिक्षक गोगटे जोगळेकर महाविद्यालयात पूर्ण केले. मानसशास्त्र विषयात नीलमने पदवी घेतली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विविध सांस्कृतिक कार्यक्रमात नीलमचा सहभाग होताच, विविध स्तरावर तिने पारितोषिके मिळविली आहेत. २०१२ साली महाविद्यालयीन स्तरावर तसेच जयहिंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘बहर’ सांस्कृतिक स्पर्धेत नीलमने सहभागी होत ‘रत्नागिरी सुंदरी’चा सन्मान मिळविला होता. त्यावेळी नीलमने पोलिस अधिकारी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
नीलमचे वडिल पोलिस दलात कार्यरत असल्याने तिला या क्षेत्राची आवड बालपणापासून होतीच मात्र अधिकारी बनण्याची मनिषा बाळगत तिने अभ्यासासाठी पुणे गाठले. दहा ते बारा तास ती अभ्यास करीत असे, शिवाय मार्गदर्शन वर्गही लावला होता. २०२० साली झालेल्या परीक्षेत मुख्य, ग्राऊंड व मुलाखतीमध्ये ५४० पैकी ३२८ गुण मिळवित ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली आहे. नीलम लवकरच नाशिक येथे प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नीलमने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून काैतुक करण्यात येत आहे.