विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 15:53 IST2022-12-24T15:53:16+5:302022-12-24T15:53:54+5:30
मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी...

विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..
चिपळूण : तालुक्यातील असुर्डे येथे सरपंचपदी झालेला विजयी उमेदवार आमचाच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाने केला होता. मात्र, त्यांचा हा दावा खुद्द सरपंच पंकज साळवी यांनीच खोडला आहे. मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच गाव विकास पॅनलचा आहे. माझ्या विजयात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा सहभाग असल्यानेच आपण सरपंच पदावर बहुमताने विजयी झालो असल्याचे नवनिर्वाचित सरपंच पंकज साळवी यांनी दिले आहे.
असुर्डे सरपंचपदाच्या निवडणुकीत गावविकास पॅनलकडून पंकज साळवी निवडणूक लढवत होते. गावाने ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून दिले. मात्र, सरपंचपदासाठी एकमत न झाल्याने निवडणूक घेण्यात आली. सरपंचपदाच्या निवडणुकीत पंकज साळवी यांनी ४०० मतांनी विजय मिळवला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी सरपंच पदावर दावा केला. मात्र, हा दावा नवनिर्वाचित सरपंच साळवी यांनी खोडून काढला आहे. नवनिर्वाचित सरपंच साळवी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सारेच आता अवाक् झाले असून, त्यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
सरपंच साळवी म्हणाले की, मुळात मी अनेक वर्षे शिवसेनेचे काम करतो आहे. नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विभागप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. मी जरी शिवसेनेचा विभागप्रमुख असलो तरी सरपंच गाव विकास पॅनलचा आहे. माझ्या विजयात शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेस अशा सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. राजकारण विरहीत निवडणूक आम्ही घेतली आहे. मी सरपंच कोणत्याच पक्षाचा नाही. त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या यादीत माझे नाव घेऊ नये, असे सांगितले आहे.