रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:09 IST2025-11-05T17:09:11+5:302025-11-05T17:09:40+5:30
याआधीच्या काळात शिवसेनेचे प्राबल्य मोठे होते. मात्र शिवसेनेचे दोन भाग झाले असल्याने शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची ठरणार

रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार
रत्नागिरी : जिल्ह्यात चार नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने आधीपासूनच राजकीय धुळवड सुरू झाली आहे. अनेक वर्षांनी निवडणुका होत असल्याने आणि गतवेळेच्या तुलनेत राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलल्याने या निवडणुका अधिक चुरशीच्या होणार आहेत. याआधीच्या काळात शिवसेनेचे प्राबल्य मोठे होते. मात्र शिवसेनेचे दोन भाग झाले असल्याने शिंदेसेना आणि उद्धवसेना यांच्यासाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या नगर परिषदा तर लांजा, देवरुख आणि गुहागर या नगर पंचायतींमध्ये निवडणूक होणार आह. दापोली आणि मंडणगड येथील नगर पंचायत निवडणुकीला अजून वर्षभराची प्रतीक्षा आहे. गतवेळेच्या निवडणुकीमध्ये रत्नागिरीमध्ये शिवसेना, राजापुरात काँग्रेस, चिपळूणला भाजप तर खेडला मनसेचा नगराध्यक्ष होता.
नगर पंचायतींमध्ये लांजात शिवसेनेचा, देवरुखला भाजपचा तर गुहागरला शहर विकास आघाडीचा नगराध्यक्ष होता. तेव्हापासून आतापर्यंतच्या काळात राजकारणात मोठे बदल झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन भाग झाले आहेत. त्यातही शिवसेनेच्या दोन्ही भागांसाठी म्हणजेच शिंदेसेना आणि उद्धवसेनेसाठी या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीत विशेष जोर लावला जाण्याची शक्यता आहे.
युती, आघाडीची गणितं
प्रत्येक पक्षातच इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची गणितं काय ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र बंडखोरी होण्याची भीती सर्व पक्षांना जाणवत आहे.
सिंधुदुर्गात तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीसाठी निवडणूक
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तीन नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत या चार पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल मंगळवारी (दि. ४) वाजला आहे. त्यामुळे या चारही शहरांमध्ये आता रणधुमाळीने वेग घेतला आहे.
मालवण, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या तीन नगरपरिषदांमध्ये १० प्रभागांमधून २० नगरसेवक आणि नगराध्यक्ष स्वतंत्र असे एकूण २१ उमेदवार निवडून येणार आहेत, तर कणकवली नगरपंचायतीमध्ये १७ प्रभागांसाठी १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे एकूण १८ जण निवडून येणार आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर ३ डिसेंबरपासून या चारही शहरांचे हे नवे कारभारी असणार आहेत.