अजबच! जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी घेतले पैसे, रत्नागिरीत एकाला ५३ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 14:14 IST2025-04-09T14:14:13+5:302025-04-09T14:14:31+5:30
रत्नागिरी : जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा ...

अजबच! जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी घेतले पैसे, रत्नागिरीत एकाला ५३ लाखांचा गंडा
रत्नागिरी : जिवंत नसलेल्या महिलेच्या उपचारांसाठी तब्बल ५३ लाख १३ हजार ५०० रुपयांची मागणी करत रत्नागिरीतील एकाला ऑनलाइन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दाेघांवर रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना ५ मे २०२२ रोजी दुपारी २:३१ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत मिरकरवाडा येथे घडली आहे.
या फसवणुकीप्रकरणी अलताफ हशमत साखरकर (३६, मूळ रा. रहबहर मोहल्ला साखरतर, सध्या रा. धनजी नाका, रत्नागिरी) यांनी सोमवारी फिर्याद दिली. त्यानुसार, अब्दुलसमद अलीमिया जयगडकर (रा. कोहिनूर प्लाझा, मांडवी रोड, रत्नागिरी) आणि प्रमिला हिंदूराव माटेकर ऊर्फ आयु पाटील (रा. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, रत्नागिरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार ५ मे २०२२ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे घडला. अब्दुलसमद जयगडकर आणि प्रमिला माटेकर यांनी अलताफ साखरकर यांना सना शेख नावाची व्यक्ती जिवंतच नसताना तिच्या उपचारांसाठी पैशांची गरज असल्याचे खोटे सांगितले.
त्यानंतर दाेघांनी साखरकर यांच्याकडून वेळोवेळी एकूण ५३ लाख १३ हजार ५०० रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यास भाग पाडले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अलताफ साखरकर यांनी प्रमिला माटेकर या महिलेकडे आपले पैसे परत मागितले. मात्र, पैसे परत न मिळाल्याने त्यांनी फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार दाेघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८ (२), ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेची धमकी
साखरकर यांनी प्रमिला माटेकर हिच्याकडे पैशांची मागणी करताच तिने माझ्या राजकारणात खूप ओळखी आहेत. तसेच मुस्लीम लोक माझ्या घरी येऊन पैशांची मागणी करतात, असा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.