आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाणीचा गुन्हा, नेमका वाद काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:22 IST2025-11-08T16:22:05+5:302025-11-08T16:22:45+5:30
कंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या वादाचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

आमदार भास्कर जाधव यांच्या मुलावर मारहाणीचा गुन्हा, नेमका वाद काय.. वाचा
खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी औद्योगिक वसाहतीतील विजय केमिकल कंपनीच्या परिसरात शिंदेसेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह सुमित शिंदे, विवेक आंब्रे आणि काही अनोळखी व्यक्तींवर खेड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवार (६ नोव्हेंबर) रोजी दुपारी १:०० ते १:३० यादरम्यान घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुधीर काते (४०, रा. लोटेमाळ, ता. खेड) हे गेल्या दहा वर्षांपासून लोटे एमआयडीसीमधील विविध कंपन्यांना मजूर पुरवण्याचे काम पाहतात. दिनांक ६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास स्थानिक रहिवासी सचिन कालेकर आणि रोहन कालेकर यांनी काते यांना विजय केमिकल कंपनीचे मॅनेजर अनंत महाडिक यांनी कामाविषयी चर्चेसाठी बोलावल्याची माहिती दिली.
त्यानुसार काते आणि त्यांच्यासोबतचे दोन सहकारी कंपनीमध्ये आले. तेथे विक्रांत जाधव (रा. पागनाका, चिपळूण), सुमित शिंदे (रा. दसपटी, चिपळूण), विवेक आंब्रे (रा. आवाशी, खेड) तसेच सुमारे सात ते आठ अनोळखी कामगार उपस्थित असल्याचे काते यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
स्थानिक तरुणांना रोजगार देण्याच्या मागणीवरून चर्चा सुरू झाली असताना अचानक वातावरण ताणले गेले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, या वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी ‘तुम्ही स्थानिक म्हणजे काय?’ असा प्रश्न करत भांडणाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी ढकलाढकली, शिवीगाळ आणि मारहाण केली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. काते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी विक्रांत जाधव, सुमित शिंदे, विवेक आंब्रे आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडीओ व्हायरल
कंपनीच्या प्रवेशद्वारावर झालेल्या या वादाचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडीओ करण्यात आला होता. त्यात विक्रांत जाधव एकाला धक्का देत असल्याचे दिसत आहे. तो आता वेगाने व्हायरल होत आहे. राजकीय पक्षांसह सर्वसामान्य लोकांमध्येही यावर चर्चा सुरू आहे.