सत्तेच्या दुरुपयोगामुळे वैद्यकीय महाविद्यालय अधोगतीकडे, विनायक राऊत यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:01 IST2025-04-02T19:00:07+5:302025-04-02T19:01:01+5:30
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारणे हे आमचे स्वप्न होते. त्यासाठी वित्तीय तरतुदीसह या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात ...

सत्तेच्या दुरुपयोगामुळे वैद्यकीय महाविद्यालय अधोगतीकडे, विनायक राऊत यांचा आरोप
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय साकारणे हे आमचे स्वप्न होते. त्यासाठी वित्तीय तरतुदीसह या महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली. मात्र, सद्य:स्थितीत या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली पदे विद्यमान सरकारकडून भरली जात नाहीत. खासदार, पालकमंत्री आणि स्थानिक आमदार सत्तेचा दुरुपयोग करून हे महाविद्यालय अधोगतीकडे नेत आहेत, असा आरोप करत येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी उद्धवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून दिला.
येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक, श्रेया परब आदी उपस्थित होते. यावेळी राऊत म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सेवेसाठी गोवा बांबुळी येथे अवलंबून राहावे लागू नये यासाठी उद्धवसेनेच्या सरकारच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले.
मात्र, आजही येथील नागरिकांना गोवा बांबुळी रुग्णालयावर अवलंबून राहावे लागत आहे. हे दुर्दैव आहे. असे सांगत आज आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्याशी चर्चा केली असता या महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले विविध पदे भरण्यात आलेली नाहीत. यात स्पेशालिस्ट डॉक्टरसह प्राध्यापक, सहप्राध्यापकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, याकडे शासनकर्ते हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला आहे.
एकदाही भेट दिली नाही आणि देणारही नाहीत!
विद्यमान खासदार नारायण राणे यांनी या वैद्यकीय महाविद्यालयाला एकदाही भेट देऊन येथील समस्या जाणून घेतलेल्या नाही. त्यामुळे याकडे त्यांचा दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांना हे महाविद्यालय सुरू ठेवायचे नसल्याने ते या महाविद्यालयाला भेटही देणार नसल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी यावेळी केला.
एका रात्रीत घर पाडतात मग..
एका रात्रीत ओरोस येथील महामार्ग नजीकच्या गादी कारखान्यालगत घरावर पालकमंत्र्यांकडून कारवाई केली जाते. मग सर्वसामान्य जनतेला लाभदायी ठरणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे लक्ष का दिले जात नाही, असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला आहे.