यापुढे वयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील - मुख्यमंत्री फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:52 IST2025-05-16T14:52:10+5:302025-05-16T14:52:25+5:30

मंडणगड येथे मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन

Measures will have to be taken for the problems of the elderly says Chief Minister Devendra Fadnavis | यापुढे वयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील - मुख्यमंत्री फडणवीस 

यापुढे वयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील - मुख्यमंत्री फडणवीस 

मंडणगड : निसर्गसंपन्न असणाऱ्या वृद्धाश्रमात येणाऱ्या वृद्धांचे आयुष्य पाच-दहा वर्षांनी वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातील उपाययोजना, त्यांच्याकरिता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार भाई जगताप, सूर्यकांत दळवी, डॉ. विनय नातू, डॉ. जलिल परकार यांच्यासह पद्मश्री दादा इदाते, डॉ. आसिफ भोजानी, ॲड. उल्हास नाईक, आसिफ मामला, वजाहद खान देशमुख उपस्थित हाेते.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, पुढच्या २० वर्षांत आपले सरासरी वय हे ८५ वर्षे होणार आहे. २०३५ नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातील उपाययोजना, त्यांच्याकरिता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यमंत्री कदम यांनी डॉ. जलील परकार यांनी वृद्धाश्रम सुरू करून वृद्धांना आधार दिल्याचे सांगितले. तसेच खासदार तटकरे यांनी या ठिकाणी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्या हक्काच्या घरामध्ये आल्यासारखे वाटेल, असे सांगितले.

आनंदही अन् खंतही

एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंत वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद याकरिता की, डॉ. जलील परकार यांनी महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार-पाच वृद्धाश्रमांत ज्याची आपण गणना करू शकतो, असा वृद्धाश्रम तयार केला आहे. परंतु, खंत याची की, आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले, अडचणी वाढल्या. काही प्रमाणात कौटुंबिक ओलावाही कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडू लागली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: Measures will have to be taken for the problems of the elderly says Chief Minister Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.