रत्नागिरीत भाजपला धक्का, तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 16:05 IST2026-01-21T16:05:36+5:302026-01-21T16:05:51+5:30
नाराज कार्यकर्त्यांनी मांडली भूमिका

रत्नागिरीत भाजपला धक्का, तब्बल ५७ पदाधिकाऱ्यांनी दिले सामूहिक राजीनामे
रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव पंचायत समिती गणात भाजपला तिकीट नाकारल्याने आणि नैसर्गिक युतीत अन्यायकारक वागणूक मिळाल्याच्या भावनेतून भाजपच्या तब्बल ५७ प्रमुख आणि सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या या राजीनाम्यांमुळे महायुतीत फूट पडल्याचे पुढे आले आहे.
कुवारबाव पंचायत समिती गणावर भाजपने दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला देण्यात आली नाही. त्याचबराेबर अपेक्षित उमेदवाराला तिकीटही नाकारण्यात आले. यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. या गणात एकूण ५७ सक्रिय कार्यकर्ते आाणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतीक देसाई यांच्याकडे दिले आहे.
कुवारबाव हा रत्नागिरी शहराजवळील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ५७ सक्रिय पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने भाजपसमोर आणि पर्यायाने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या असंतोषाचा फायदा विरोधकांना होणार का? वरिष्ठ नेते ही बंडखोरी थंड करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाराज कार्यकर्त्यांनी मांडली भूमिका
आम्ही यापुढे भाजपच्या कोणत्याही संघटनात्मक कार्यात सहभागी होणार नाही. आम्ही पक्षाचे फक्त ‘शुभचिंतक’ आणि ‘मतदार’ म्हणून राहू, असे त्यांनी जाहीर केले आहे. महायुतीतील अंतर्गत कलह आणि स्थानिक पातळीवर होणारा अन्याय यामुळे हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
मी फक्त हे राजीनामे स्वीकारले आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आणि हे राजीनामे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठवले जातील. - प्रतीक देसाई, तालुकाध्यक्ष