रत्नागिरीत महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, नगराध्यक्षपद कुणाला, काँग्रेसला किती जागा?.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:03 IST2025-11-17T16:02:19+5:302025-11-17T16:03:50+5:30
Local Body Election: अनेकांचे पत्ते कट? मनसेचे काय?

रत्नागिरीत महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं, नगराध्यक्षपद कुणाला, काँग्रेसला किती जागा?.. वाचा सविस्तर
रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील स्थानिक नेत्यांनी घेतला आहे. त्यानुसार उद्धवसेनेला १८ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा देण्याचे निश्चित झाले आहे, तर राष्ट्रवादी आपल्या वाट्यातील काही जागा काँग्रेसला देणार आहे.
निवडणूक जाहीर हाेऊन पंधरवडा उलटला तरी महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्ष पदावरून रस्सीखेच सुरू हाेती. नगराध्यक्ष पदासह जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडण्यासाठी सर्व पक्षांनी जाेर लावला हाेता. त्यामुळे महाविकास आघाडीचं घाेडं अडलेलं हाेतं.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तीन पक्षांच्या बैठका सुरू हाेत्या. मात्र, शनिवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या बैठकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष पदासह १८ जागा उद्धवसेनेला, तर १४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचे निश्चित करण्यात आले, तर काँग्रेसला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या हे राष्ट्रवादी काँग्रेस ठरवणार आहे.
अनेकांचे पत्ते कट?
महाविकास आघाडी होणार की नाही, याबाबत निर्णय झालेला नव्हता. त्यामुळे उद्धवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले होते. आता महाविकास आघाडी झाल्याने अनेकांचे पत्ते कट झाले आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
नगराध्यक्ष पद उद्धवसेनेला
नगराध्यक्षपदासाठी उद्धवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू होती. उद्धवसेनेने आधीच नगराध्यक्षपदावर दावा करून उमेदवार निश्चित केला हाेता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी पत्नीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला हाेता. मात्र, महाविकास आघाडी झाल्याने उद्धवसेनेला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले.
काँग्रेसला किती जागा?
जागावाटपात राष्ट्रवादी आपल्या वाट्यातील काही जागा काँग्रेसला देणार आहे. मात्र, किती जागा दिल्या जाणार हे अद्याप ठरलेले नाही.
मनसेचे काय?
महाविकास आघाडीने या निवडणुकीत मनसेला आपल्यासाेबत घेतलेले नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे मनसे आघाडीसाेबत राहणार की, अन्य पर्याय निवडणार हे गुलदस्त्यातच आहे.