Local Body Election Voting: चार यंत्रे बिघडली; रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 14:07 IST2025-12-03T14:06:48+5:302025-12-03T14:07:05+5:30
सर्वाधिक गुहागरात ७५.२६ तर रत्नागिरीत सर्वात कमी ५५.०९ टक्के

Local Body Election Voting: चार यंत्रे बिघडली; रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के मतदान
रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २०० मतदान केंद्रांवर सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी ६८.१४ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५१ हजार २२७ महिलांनी आणि ४९ हजार १९८ पुरुषांनी तसेच अन्य एका मतदाराने अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वाधिक मतदान गुहागरमध्ये ७५.२६ टक्के तर सर्वात कमी मतदान रत्नागिरीत ५५.०९ टक्के झाले.
जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, खेड आणि चिपळूण या चार नगरपरिषद आणि गुहागर, देवरुख आणि लांजा या नगरपंचायतीसाठी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी ज्येष्ठांमध्येही मतदानाचा उत्साह दिसून येत होता. सुरुवातीपासून मतदानाला चांगला प्रतिसाद होता. जिल्ह्यात सकाळी ९:३० वाजेपर्यंत १४.२६ टक्के मतदान झाले. ११:३० वाजता ३०.८९ टक्के, दुपारी १:३० वाजता ४६.६४ टक्के, ३:३० वाजता ५८.३१ आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी ५:३० वाजता ६४.१४ टक्के अंतिम मतदान झाले.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एक लाख ६० हजार ४५७ मतदारांची नोंद झाली होती. ७७ हजार ८८५ पुरुष आणि ८२ हजार ५६२ महिला मतदारांचा यात समावेश होता. यापैकी मंगळवारी ५१ हजार २२७ महिलांनी आणि ४९ हजार १९८ पुरुषांनी तसेच अन्य एका मतदाराने अशा एकूण १ लाख ४२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत जिल्ह्यात सरासरी ६८.१४ टक्के अंतिम मतदान झाले.
पालिका मतदानाची टक्केवारी
- रत्नागिरी ५५.०९
- चिपळूण ६४.१५
- खेड ६२.५३
- राजापूर ७४.५५
- लांजा ७१.०६
- देवरुख ७४.३३
- गुहागर ७५.२६
चार यंत्रे बिघडली
या प्रक्रियेदरम्यान रत्नागिरी आणि लांजा या ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याचा प्रकार घडला. ही मतदान यंत्रे तत्काळ बदलून पुन्हा मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. रत्नागिरीत प्रभाग ३ व प्रभाग १४ मधील मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला हाेता. ही यंत्रे तत्काळ बदलण्यात आली. लांजात प्रभाग ९ मधील मतदान यंत्र बंद पडल्याचा प्रकार घडला हाेता. या ठिकाणी नवीन मतदान यंत्र देण्यात आले. तसेच प्रभाग १७ मध्ये मतदानापूर्वी यंत्राची तपासणी करताना ते नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. त्यामुळे या ठिकाणी नवीन मतदान यंत्र देण्यात आले.