Ratnagiri: समुद्रात लाटांमध्ये अडकल्या, बुडू लागताच केला आरडाओरडा; जीवरक्षकांमुळे कोल्हापूरच्या तिघींचा वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:56 IST2025-10-18T11:54:49+5:302025-10-18T11:56:24+5:30
दोन महिलांसह युवतीचा समावेश

Ratnagiri: समुद्रात लाटांमध्ये अडकल्या, बुडू लागताच केला आरडाओरडा; जीवरक्षकांमुळे कोल्हापूरच्या तिघींचा वाचला जीव
गणपतीपुळे (जि. रत्नागिरी) : समुद्रात अंघाेळ करताना लाटांमध्ये बुडणाऱ्या दाेन महिलांसह एका युवतीचा जीव वॉटर स्पोर्टस् व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवत वाचविला. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास श्रीक्षेत्र गणपतीपुळे (ता. रत्नागिरी) येथे घडली. तिन्ही महिला जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील आहेत.
निशा अजय सांगळे (वय ३०), हर्षदा प्रमोद मिटके (वय ३०) आणि तनुजा रमेश आभाळे (वय १७) अशी तिघींची नावे आहेत. काेल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथून २३ जणांचा एक ग्रुप गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी गुरुवारी सायंकाळी मुक्कामासाठी आला हाेता. शुक्रवारी समुद्रामध्ये अंघोळ करून देवदर्शन उरकून हे सर्वजण परतीच्या प्रवासाला निघणार होते. शुक्रवारी सकाळी सर्वजण ग्रामपंचायतीच्या स्वच्छतागृह इमारतीच्या समोरील समुद्राच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले हाेते. अंघाेळ करताना निशा सांगळे, हर्षदा मिटके यांच्यासह तनुजा आभाळे समुद्राच्या मोठ्या लाटांमध्ये अडकल्या. त्यांना समुद्रातून बाहेर पडता येत नव्हते.
समुद्राच्या माेठ्या लाटांमुळे त्या बुडू लागताच त्यांनी आरडाओरडा सुरू केला. हा प्रकार लक्षात येताच समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या वॉटर स्पोर्ट व्यावसायिकांनी आपल्या स्पीड बोटीच्या साहाय्याने तत्काळ धाव घेतली आणि तिघींनाही पाण्याबाहेर काढले. तिघींनाही अधिक उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे यांनी सांगितले. त्यांना आवश्यक सूचना देऊन घरी सोडण्यात आले.
प्रसंगावधानामुळे वाचले प्राण
वाॅटर स्पाेर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी प्रसंगावधान दाखवून मदतकार्य केले. त्यामुळे समुद्रात बुडणाऱ्या तिघींनाही वाचविण्यात यश आले. दैव बलवत्तर म्हणून तिघींचे प्राण वाचले असून, माेठी दुर्घटना टळली. वाॅटर स्पाेर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांच्या तत्परतेचे काैतुक करण्यात येत आहे.