रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:38 IST2025-07-25T18:37:31+5:302025-07-25T18:38:32+5:30
भीषण धडकेत बिबट्याचे शीर धडावेगळे झाले होते

रत्नागिरीत मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या धडकेत बिबट्या ठार
रत्नागिरी : मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेससमोर ट्रॅकवर बिबट्या आडवा आल्याने त्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना रत्नागिरीतील गणेशनगर (कुवारबाव) येथील आरटीओ कार्यालयानजीकच्या रेल्वेपुलाजवळ काल, गुरुवारी (दि.२४) रात्रीच्या सुमारास घडली.
रेल्वे पोलिस पृथ्वीराज चव्हाण यांनी रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांना ही माहिती देताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ जागेवर जाऊन खात्री केली. त्यावेळी मृत बिबट्या ट्रॅकच्या शेजारी पडलेला दिसला. त्याचे शीर धडावेगळे झाले होते. विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी, चिपळूण) गिरीजा देसाई, रत्नागिरी सहायक वनसंरक्षक (चिपळूण) प्रियंका लगड यांना याबाबत माहिती देण्यात आली.
आज, शुक्रवारी (दि. २५) पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रणभारे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्याच्या शरीराची विल्हेवाट लावण्यात आली.