पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 12:41 IST2025-05-21T12:40:21+5:302025-05-21T12:41:14+5:30

सुमारे अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरू

Landslide between Veravali Vilavade station on Konkan Railway route disrupts traffic on this route | पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

पावसाचा कोकण रेल्वेला फटका; वेरवली विलवडे रेल्वेस्टेशन दरम्यान दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

लांजा : पहिल्याच जोरदार पावसाचा फटका मंगळवारी कोकण रेल्वेला बसला. सायकाळी ६:३० वाजेच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावरील वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यादरम्यान ये- जा करणाऱ्या रेल्वे ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या. काही काळ ठप्प झालेली वाहतूक रात्री नऊ वाजेच्या सुमारास मार्गावरील माती हटविल्यानंतर सुरू झाली.

मंगळवारी दुपारनंतर मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाची संततधार सुरू असल्याने या पावसाचा फटका कोकण रेल्वे मार्गाला बसला. वेरवली - विलवडे स्टेशनदरम्यान सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मार्गावर दरड कोसळून माती रेल्वे मार्गावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दोन्ही बाजूंनी येणाऱ्या रेल्वे तातडीने जवळच्या स्थानकांवर थांबविण्यात आल्या. 

कोकण रेल्वे प्रशासनाला तातडीने कळविण्यात आले. त्यानंतर प्रशासनाची यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचली. कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागाचे व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह अन्य अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले. अथक प्रयत्नांनंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही दरड बाजूला करण्यात यंत्रणेला यश आले.

यादरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस कणकवली स्थानकात थांबवण्यात आल्या, तर नेत्रावती एक्स्प्रेसला संबंधित स्थानकात थांबा देण्यात आला. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या अन्य अनेक गाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाला. सुमारे अडीच तासांनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात यंत्रणेला यश आले.

Web Title: Landslide between Veravali Vilavade station on Konkan Railway route disrupts traffic on this route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.