कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 02:34 PM2022-01-24T14:34:23+5:302022-01-24T14:34:43+5:30

कोकणातील ठराविक भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी फळपिके नैसर्गिकरीत्या पाहायला मिळत आहेत

Konkan Java Plum to get GI rating | कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन!

कोकणच्या जांभळाला मिळणार जीआय मानांकन!

Next

रत्नागिरी : कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण फळ पिकांना जीआय मानांकन मिळण्यासाठी दापाेली कोकण कृषी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. त्यावर आता नवे संशोधनही सुरु झाले असून, पालघर बहाडोलीचे जांभूळ आणि बदलापूरचे जांभूळ हे जीआय मानांकनासाठी प्रतवारीमध्ये सर्वोत्तम ठरले आहे. 

यापूर्वी अलिबागचा पांढरा कांदा, देवगड व रत्नागिरीचा हापूस, श्रीवर्धनची सुपारी ही फळपिके जीआय मानांकनासाठी प्रस्तावित झाली आहेत. कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे आणि फळपिकाच्या संशोधनात अग्रभागी असलेले सहयोगी प्रा. डॉ. जितेंद्र कदम यांनी याविषयी माहिती दिली. 

त्यांनी सांगितले की, कोकणातील ठराविक भागांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशी फळपिके नैसर्गिकरीत्या पाहायला मिळत आहेत. यामध्ये देवगड आणि रत्नागिरीचा हापूस याची चव, गोड, आकार, रंग सर्वच उत्तम आहेत. त्यामुळे मानांकनाच्या स्पर्धेत हा सर्वोत्तम ठरला आहे. त्यापाठोपाठ अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची चव वैशिष्ट्यपूर्ण असून, गोडवा अधिक आहे. तसेच औषधी गुणधर्मही आहे. आता तिसऱ्या मानांकनासाठी जांभूळ हे फळ जाणार आहे.

पालघर तालुक्यातील बहाडोलीचे जांभूळ हे आकाराने मोठे, चवीला उत्तम आणि औषधी गुणधर्म असलेले जांभूळ आहे. अशाच पद्धतीचे जांभूळ ठाणे जिल्ह्यातील बदलापूर भागातही आहे. या दोन्ही जांभळांची प्रतवारी तपासली जात आहे. यावर संशोधनही होत आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर जीआय मानांकनासाठी त्याचा प्रवास सुरु होईल, असेही संशोधकांनी स्पष्ट केले. 

कोकणच्या वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या जांभळाची चर्चा सर्वदूर आहे. म्हणूनच या हंगामात या जांभळाच्या भौगोलिक मानांकनाची परीक्षा होणार आहे. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास या माध्यमातून विविध संस्था पुढे येऊन जांभळाच्या लागवड वाढीचे प्रयत्न करत आहेत.

Web Title: Konkan Java Plum to get GI rating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.