HSC Exam Result 2025: सलग चौदाव्या वर्षी कोकणचा राज्यात झेंडा, विभागात सिंधुदुर्ग प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:24 IST2025-05-06T16:24:06+5:302025-05-06T16:24:57+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात ...

संग्रहित छाया
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत सलग १४ व्या वर्षी राज्यात कोकण बोर्डाने अव्वल क्रमांक मिळविला. दरवर्षीप्रमाणे कोकण बोर्डात सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कोकण बोर्डाचा निकाल ९६.७४ टक्के लागला असून, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल ९५.६७ टक्के, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल ९८.७४ टक्के लागला आहे.
कोकण बोर्डांतर्गत एकूण २४३ महाविद्यालये असून, ६१ परीक्षा केंद्रे आहेत. कोकण बोर्डांतर्गत एकूण २३ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ५६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील एकूण २२ हजार ७९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९६.७४ टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल अधिक
शाखानिहाय निकालामध्ये बोर्डात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.१६ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ वाणिज्य शाखेचा निकाल ९८.०६ टक्के लागला आहे. कला शाखेचा निकाल ९२.२१ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ९७.१३ टक्के लागला आहे. टेक्निकल सायन्सचा निकाल ९२.१५ टक्के लागला आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक
कोकण बोर्डात एकूण ११ हजार ४१८ मुले उत्तीर्ण झाली असून, उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.५० टक्के आहे, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.०३ टक्के आहे. तुलनात्मकदृष्ट्या मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण २.५३ टक्क्यांनी अधिक आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचा ९५.६७ टक्के निकाल
रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १४ हजार ६३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकाल ९५.६७ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.९९ टक्के असून, मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९७.३७ टक्के आहे. जिल्ह्यात मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम
सिंधुदुर्ग जिल्ह्याने यंदाही सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८,२६६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, जिल्ह्यातील ८,१६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकाल ९८.७४ टक्के लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९८.२३ टक्के, तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.२७ टक्के आहे. जिल्ह्यातही मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण सर्वाधिक आहे.