ओल्या काजूगरासाठी कोकण कृषी विद्यापीठाने शोधली नवी जात, यंत्राशिवाय काजूगर काढता येणार
By मेहरून नाकाडे | Updated: January 1, 2026 16:04 IST2026-01-01T16:03:35+5:302026-01-01T16:04:51+5:30
लवकरच कलमे लागवडीसाठी उपलब्ध

ओल्या काजूगरासाठी कोकण कृषी विद्यापीठाने शोधली नवी जात, यंत्राशिवाय काजूगर काढता येणार
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : कोकणातीलच नाही तर देशविदेशातील खवय्यांकडून ओल्या काजूगरासाठी वाढती मागणी आहे. त्यासाठी डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांच्या वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने ‘वेंगुर्ला १०’ हे नवीन वाण विकसित केले आहे. उत्पादन, चव, उत्पन्न, सर्व स्तरावर हे वाण सरस ठरले असून, लवकरच या वाणाची कलमे शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जानेवारीपासूनच ओल्या काजूचा हंगाम सुरू होतो. गावठी काजूचा हंगाम उशिरा सुरू होतो. विद्यापीठ प्रमाणित ‘वेंगुर्ला ६ व ७’चा हंगाम लवकर सुरू होतो. मात्र, या जातीच्या काजू बीच्या टरफलाची साल जाड असते. शिवाय तेलाचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे गर काढायला त्रास होतो, शिवाय त्वचेवर डाग पडतात. त्यामुळे वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्राने संशोधन करून नवीन ‘वेंगुर्ला १०’ जात खास ओल्या काजूगरासाठी विकसित केली आहे.
यामध्ये तेलाचे प्रमाण कमी आहे, त्वचेवर काही परिणाम होत नाही. शिवाय गर सहज कुणीही काढू शकेल इतकी साल पातळ आहे. वैशिष्ट्य म्हणजे काजू कलम लागवडीनंतर तिसऱ्या वर्षीपासून मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन सुरू होते. केवळ ओल्या काजूगरासाठी नाही तर प्रक्रिया, थेट खाण्यासाठीही उत्तम आहे. एका किलोमध्ये ११४ ते ११५ ओल्या काजू बी येतात, तर एका किलोला २५५ ते २५६ ओले काजूगर मिळतात. हा काजू खाण्यासाठी अतिशय चविष्ट आहे.
यंत्राशिवाय काजूगर
ओले काजूगर सर्वांनाच आवडतात. परंतु बी मधून गर काढणे अवघड असते. शिवाय काढणाऱ्याच्या त्वचेवर डाग पडतात. मात्र, वेंगुर्ला प्रादेशिक संशोधन केंद्रात विकसित केलेले ‘वेंगुर्ला १०’ हे वाण सर्व दृष्टींनी फायदेशीर आहे. कोणत्याही यंत्राशिवाय काजूगर काढता येणार आहे. अवघ्या १८ ते २० सेकंदात गर काढता येणार आहे. सर्व स्तरावरील प्रात्यक्षिकानंतर संशोधन केंद्रातर्फे दोन हजार कलमे तयार करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.