पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 14:19 IST2023-06-22T14:18:47+5:302023-06-22T14:19:38+5:30
यापूर्वीही दोन ते तीन वेळा आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरण: पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
रत्नागिरी : राज्यभर चर्चेत असलेल्या राजापूर तालुक्यातील पत्रकार शशिकांत वारिशे खून प्रकरणातील संशयित पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने बुधवारी पुन्हा नाकारला. या जामीन अर्जावर सोमवार आणि मंगळवारी दोन्ही पक्षातर्फे न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यात आला होता.
६ फेब्रुवारीला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास राजापूर पेट्रोल पंप येथे ही घटना घडली होती. वारिशे पेट्रोल भरून बाहेर पडले होते. त्यावेळी संशयित आंबेरकर याने महिंद्रा थार गाडीने वारिशे यांच्या ताब्यातील दुचाकीला चिरडले होते. असा आरोप संशयितावर ठेवण्यात आला होता. या अपघातात शशिकांत वारिशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी पत्रकार वारिशे यांचा मेहुणा अरविंद दामोदर नागले याने राजापूर पोलिस स्थानकात संशयित आंबेरकर विरुद्ध तक्रार दिल्यानंतर भादंवि कलम ३०२, २०१ व महाराष्ट्र प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम २०१७ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दुर्घटनेनंतर अटक करण्यात आलेला आंबेरकर पोलिस कोठडी संपल्यानंतर अजूनही न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी नुकतेच त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्याने आंबेरकरने न्यायालयात जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तोही नाकारला असून, यापूर्वीही दोन ते तीन वेळा आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. अनिरुद्ध फणसेकर यांनी काम पाहिले.