जयगड बंदराचा ‘हब’ म्हणून विकास करणार - मंत्री नितेश राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:07 IST2025-09-12T18:07:37+5:302025-09-12T18:07:55+5:30

कोकण विकासाचे पाऊल

Jaigad Port will be developed as a hub says Minister Nitesh Rane | जयगड बंदराचा ‘हब’ म्हणून विकास करणार - मंत्री नितेश राणे 

जयगड बंदराचा ‘हब’ म्हणून विकास करणार - मंत्री नितेश राणे 

रत्नागिरी : कोकणाची अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना देण्यासाठी जयगड बंदराला एक महत्त्वाचे केंद्र (हब) म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्याला कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाचीही जोड असेल. यामुळे विकासाला चालना मिळून कोकणवासीयांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी जयगड पोर्ट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

जेएसडब्ल्यू पोर्ट कंपनीचे अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी, मत्स्यव्यवसाय, बंदर विभाग, कृषी, अपेडा, मित्रा या संस्थांचे प्रतिनिधी, कोकण रेल्वे यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक मंत्री राणे यांनी गुरुवारी (११ सप्टेंबर) जयगड येथे घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

ते म्हणाले की, या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने जयगड बंदराचा विकास कसा करता येईल, यावर सखोल चर्चा झाली. जयगड बंदराचा वापर आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादनांच्या निर्यातीसाठी एक सक्षम केंद्र म्हणून करायचा आहे. सध्या या उत्पादनांची निर्यात मुख्यत: उरण येथील जेएनपीटी बंदरातून होते. मात्र, त्यामुळे वाहतूक खर्च आणि लॉजिस्टिक्स मोठ्या प्रमाणात वाढतो. या खर्चाला आळा घालण्यासाठी आणि स्थानिक उत्पादकांना फायदा होण्यासाठी जयगड बंदर जेएनपीटीला एक सक्षम पर्याय म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे.

रेल्वेमार्गामुळे कोकणचा विकास आर्थिक वेगाने

कोकणाला संपूर्ण महाराष्ट्राशी जोडणारा वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग हाही या बैठकीत चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा होता. माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांचा या रेल्वेमार्गासाठी सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास कोकणचा विकास अधिक वेगाने होईल आणि जयगड बंदराला त्याचा मोठा फायदा होईल. त्यामुळे त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे मंत्री राणे म्हणाले.

Web Title: Jaigad Port will be developed as a hub says Minister Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.