Video - नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचला; स्थानिकांनी अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 11:57 IST2019-06-30T11:48:35+5:302019-06-30T11:57:26+5:30
मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचल्यामुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि संतप्त नागरिकांनी महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काहीवेळ त्याच पुलावर बांधून ठेवले होते

Video - नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचला; स्थानिकांनी अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं
खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचा जोड रस्ता खचल्यामुळे मनसेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि संतप्त नागरिकांनी महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना काहीवेळ त्याच पुलावर बांधून ठेवले होते. शनिवारी (29 जून) सायंकाळी हा प्रकार घडला. त्यांना लगेच सोडण्यातही आले. मात्र काहीवेळ तणावाचे वातावरण होते.
नव्याने बांधण्यात आलेल्या जगबुडी पुलाच्या जोडरस्त्याला मोठमोठी भगदाडे पडली आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जगबुडी नदीवरील जुन्या पुला शेजारी हा नवीन पूल बांधण्यात आला आहे. येत्या काही दिवसात या पुलावरून नियमित वाहतूक सुरू करण्यात येणार होती. मात्र त्याआधीच या पुलाचा जोडरस्ता खचला आहे.
जोडरस्त्याला भगदाड पडल्याची माहिती मिळताच आमदार संजय कदम व खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी तात्काळ भरणे येथे धाव घेऊन पुलाची पाहणी केली. यानंतर निकृष्ट कामाचा व पाठिशी घालणाऱ्या प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी भरणे नाका येथे रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्याचवेळी तेथे आलेले कार्यकारी अभियंता (हायवे) बामणे व उपआभियंता गायकवाड या अधिकाऱ्यांना नवीन जगबुडी पुलाला बांधण्यात आले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे लगेचच त्यांची सुटका झाली.