रत्नागिरी जिल्ह्यात १,०३७ कोटींची गुंतवणूक होणार : मंत्री उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 18:47 IST2025-04-10T18:46:59+5:302025-04-10T18:47:34+5:30

रत्नागिरी : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात १,०३७ कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत ...

Investment of Rs 1037 crores will be made in Ratnagiri district says Minister Uday Samant | रत्नागिरी जिल्ह्यात १,०३७ कोटींची गुंतवणूक होणार : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात १,०३७ कोटींची गुंतवणूक होणार : मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात १,०३७ कोटींची गुंतवणूक होणार आहे. रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे. पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी महिलांनी आता पुढे आले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्रीउदय सामंत यांनी केले.

येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बुधवारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योगमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर, राहुल पंडित, महेश म्हाप, सुदेश मयेकर, स्मितल पावसकर, बिपीन बंदरकर, कांचन नागवेकर आदी उपस्थित होते.

स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून झालेल्या १,०३७ कोटींच्या सामंजस्य करारात लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्सची ५५० कोटी आणि एमएसएमईच्या माध्यमातून ५०० कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात ११५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे. सबसिडी देण्याचे प्रमाण ९८ टक्के आहे, असे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले.

मागच्या वर्षी १ हजार कोटींचे विस्तारीकरण झाले, त्यातील ७०० कोटींची अंमलबजावणी झाली असून, ३०० कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार आहे.  सीएमईजीपी योजनेत ११७ टक्के विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने कर्ज मंजूर करून सर्वात चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनेही चांगली कामगिरी केली असल्याचे सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरीत सेमीकंडक्टर, डिफेन्स क्लस्टर, असे मोठे प्रोजेक्ट आले आहेत. निवेंडी, वाटद याठिकाणीही एमआयडीसी येतेय. यामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. त्यासाठी युवकांनी आवश्यक ते प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

अजिंक्य अजगेकर यांनी प्रास्ताविक केले. सीएमईजीपी, पीएमईजीपीच्या लाभार्थ्यांना कर्ज वितरण पत्रे देण्यात आली. त्याचबरोबर सीएमईजीपी मध्ये १०० टक्के उद्दिष्ट प्राप्त करणाऱ्या बँकांचाही यावेळी स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला. या  जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेला बँकर्स, गुंतवणूकदार, उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१० कोटींचे करार

महिला बचत गट उमेदअंतर्गत फूड अँड फ्रूट प्रोसेसिंग क्लस्टर चिपळूण, फिश प्रोसेसिंग क्लस्टर दापोली, गारमेंट क्लस्टर चिपळूण या तीन औद्योगिक समूहाकरिता १५ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. या तीन औद्योगिक समूहांसोबत १० कोटींचे करार करण्यात आले.

Web Title: Investment of Rs 1037 crores will be made in Ratnagiri district says Minister Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.