हमखास उत्पन्न देणारे ‘पांढरे सोने’ काळवंडले; फुलकिड्यांमुळे काजूला फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 06:08 PM2024-04-02T18:08:44+5:302024-04-02T18:19:30+5:30

फवारणी खर्चाने जीवाला चटका

Infestation of moth, Tim mosquito diseases on cashew nuts | हमखास उत्पन्न देणारे ‘पांढरे सोने’ काळवंडले; फुलकिड्यांमुळे काजूला फटका 

हमखास उत्पन्न देणारे ‘पांढरे सोने’ काळवंडले; फुलकिड्यांमुळे काजूला फटका 

रत्नागिरी : ‘पांढरे सोने’ म्हणून जिल्ह्याला हमखास उत्पन्न देणाऱ्या काजू पिकाला हवामानाची मोठी झळ बसली असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. काजूवर फुलकिडे, टीम माॅस्क्युटो रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे यावर्षी ४० ते ५० टक्के इतकेच उत्पादन आहे. यावर्षी गावठी काजूसाठी १०५ तर वेंगुर्ला ४ व ५ साठी ११५ रुपये दर दिला जात आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढवून मिळावा किंवा हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ओल्या काजूगर विक्रीबरोबर वाळविलेल्या काजू बीची विक्री करून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळते. गावठी काजूबरोबर कोकण कृषी विद्यापीठ प्रमाणित वेंगुर्ला ४ व ५ या वाणाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, सुरुवातीपासून फुलकिडे (थ्रीप्स), टीम माॅस्क्युटो रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे काजू पिकावर कीडरोग प्रतिबंधात्मक फवारणी करावी लागली. काही ठिकाणी फवारणी करूनही शेतकरी फुलकिड्यावर नियंत्रण मिळवू शकले नसल्यामुळे काजू बीच्या टरफलावर काळे डाग पडून बिया काळवंडल्या आहेत.

हवामानातील बदलामुळे यावर्षी काजूचे उत्पादन घटले असून, उत्पादन व खर्च यांचा मेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्रक्रिया केलेल्या काजुगराचाही उठाव होत नसल्याने प्रक्रिया उद्योग धोक्यात आला आहे. शासनाकडून काजूला योग्य हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. काजू बोंडावर तसेच टरफलावर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे ते मातीमोल होते. अशा प्रक्रिया व्यवसायांना चालना मिळणे आवश्यक आहे.

आयातीमुळे स्थानिक उत्पादनावर परिणाम

विविध प्रक्रिया उद्योगांसाठी काजुगरांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. काजूवरील तुलनात्मकदृष्ट्या कमी असलेले आयात कर व अन्य करांमुळे परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या काजूचा दर देशातील काजूच्या तुलनेने कमी असतो. त्यामुळे सिंगापूर, आफ्रिका, ब्राझील, व्हिएतनाम या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काजू बी भारतात आयात केली जाते. याचा प्रतिकूल परिणाम देशी काजू बीच्या खरेदीवर होत आहे.

  • काजूचे एकूण क्षेत्र १ लाख १० हजार हेक्टर
  • काजूचे उत्पादन हेक्टरी ३ टन
  • वार्षिक उलाढाल १५० कोटी
  • काजू बोंड निर्मिती ६० टक्के


काजू पिकावरील संकटे

  • प्रतिकूल हवामानामुळे व्यवस्थापन खर्चात वाढ
  • खते, फवारणी खर्चात वाढ, पण काजू बी दर अल्प
  • मनुष्यबळाचा अभाव
  • कमी असलेल्या आयात करामुळे परदेशी काजूचा दर कमी
  • जादा दरामुळे स्थानिक काजूपेक्षा परदेशी काजूला मोठी मागणी
  • मोठ्या कंपन्या, व्यापाऱ्यांकडून कमी दराने काजू खरेदी

हवामानातील बदलाचा परिणाम काजू पिकावरही होऊ लागला आहे. कीडरोगापासून संरक्षण करण्यासाठी आंब्याप्रमाणे कीटकनाशक फवारणी करावी लागत आहे. उत्पादनासाठी खर्च वाढला आहे. तुलनेने अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने काजूला हमीभाव जाहीर करावा. - रोहित कळंबटे, रत्नागिरी.

Web Title: Infestation of moth, Tim mosquito diseases on cashew nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.