जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग, अनेक ठिकाणी भरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 13:59 IST2020-07-07T13:57:56+5:302020-07-07T13:59:01+5:30
रत्नागिरी : गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळपासून जोरदार पडण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने ...

जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटींग, अनेक ठिकाणी भरले पाणी
रत्नागिरी : गेले काही दिवस सरीवर कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी सकाळपासून जोरदार पडण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरणही पूर्णपणे भरले असून, पाणी वाहू लागले आहे. पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील संगमेश्वर येथे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने सर्वांना झोडपून काढले. रत्नागिरी शहरातील सखल भागात पाणी साचले होते. मारूती मंदिर येथील भाजी मार्केटमध्येही पाणी शिरले होते. पावसाचा जोर आणि समुद्राला आलेल्या भरतीमुळे किनारपट्टीवर जोरदार लाटांचा मारा सुरू होता. किनारपट्टी भागातील काही भागांमध्ये भरतीचे पाणी घुसले होते. तर रत्नागिरीतील मिऱ्या, काळबादेवी आदी ठिकाणी उधाणाच्या लाटा उसळल्या होत्या.
पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाजवळ झाड कोसळले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. झाड कोसळल्याचे कळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे. तर चिपळूण तालुक्यातील शिपोशी बंदर, उमरोली, बाणकोट रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
अ३३ंूँेील्ल३२ ं१ीं