चिपळुणात कात कारखान्यावर छापा, जीएसटी'ची कारवाई; तपासाबाबत गुप्तता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 15:16 IST2026-01-10T15:15:08+5:302026-01-10T15:16:43+5:30
पथकाच्या हाती काय लागले?

चिपळुणात कात कारखान्यावर छापा, जीएसटी'ची कारवाई; तपासाबाबत गुप्तता
चिपळूण : तालुक्यातील दहीवली खुर्द येथील एका कात उद्योगावर गुरुवारी पहाटे जीएसटी विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. सावर्डे परिसरात महिनाभरात ही सलग दुसरी कारवाई आहे. मात्र, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, अधिकृतपणे कोणतीच माहिती पुढे आलेली नाही.
काही दिवसांपूर्वीच सावर्डे येथील एका कात उद्योजकावर ईडीचा छापा पडला होता. सलग दोन दिवस ईडीचे पथक तिथे ठाण मांडून होते. मात्र, या कारवाईनंतर त्याचे पुढे काय झाले हे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. या कारवाईदरम्यान काही प्रमाणात बेकायदेशीर लाकूडसाठाही आढळला होता. मात्र, त्याबाबतही नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, हे अद्याप उघड झालेले नाही. या कारवाईनंतरही सावर्डे परिसरातील कात कारखाने तितक्याच जोमाने सुरू आहेत.
सावर्डे पंचक्रोशीतील दहीवली खुर्द येथे गेल्या अनेक वर्षांपासून कात कारखाना सुरू आहे. गुरुवारी पहाटे ५:३० वाजता जीएसटी अधिकारी पथकाच्या गाड्यांचा ताफा दहीवली गावात दाखल झाला. पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने कारखान्याचा परिसर पूर्णत: ताब्यात घेत मुख्य प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान तैनात केले. कारखान्याच्या आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही, तसेच बाहेरूनही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत अधिकारी कारखान्यात तळ ठोकून होते. मात्र, नेमके काय निष्पन्न झाले हे स्पष्ट झालेले नाही.
पथकाच्या हाती काय लागले?
जीएसटीचे अधिकाऱ्यांनी पहाटेच छापा टाकला. मात्र, या छाप्यात पथकाने नेमके काय पाहणी केली? पथकाच्या हाती काही लागले आहे? हा छापा नेमका कशासाठी हाेता? याबाबतची सारी माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.